राहिले रे दूर घर माझे…!

यक्ष
यक्ष

५१ ‘यक्ष’, अष्टविनायक नगर. आमच्या नांदेडच्या घराचा पत्ता. घराला नाव देणे हा प्रकार अमेरिकेत बिलकुलच नाही. अपार्टमेंट मध्ये राहत असाल तर अपार्टमेंट कॉम्प्लेक्सला नाव असते. पण स्वत:चे घर असले तर मात्र त्याला नाव नसते. घराचा नंबर आणि रस्त्याचा पत्ता. नवीन-नवीन इथे आल्यावर मला ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवली होती. आपल्याकडे कसे ‘अमुक तमुक निवास’, ‘अमुक तमुक सदन’ किंवा ‘आशीर्वाद’ अशी नावं सर्रास दिसतात. बाबांच्या एका मित्रांच्या घराचे नाव तर चक्क शून्य! खरेच घराला नावं देण्याची सुरुवात कशी सुरू झाली असावी? बाबांनी मोठ्या हौसेने आमच्या घराला नाव दिले होते. ‘यक्ष’. त्यामागे दोन मुख्य कारणं होती. एक म्हणजे बाबांचे नाव विजय आणि आमच्या सगळ्यांची नावे ‘क्ष’ पासून जसे कि क्षिप्रा, क्षमा, क्षमता (आता या क्षमताचं मुग्धा कशी झाली हे वाचायचे असेल तर इथे वाचा!) आणि क्षितिज. मग बाबांच्या ‘य’ ने सुरुवात आणि आमच्या ‘क्ष’ ने शेवट. दुसरे कारण म्हणजे बाबा बँकेत मनेजर म्हणून काम करायचे. कुबेराच्या मनेजराचे नाव पण यक्ष! म्हणून मग आमच्या घराचे नाव ‘यक्ष’ असे ठेवण्यात आले. बाकी ‘५१’ या पत्त्याची पण एक गम्मत आहे बरका. घराचा नंबर ५१ आहे कि नाही हे मला काही आठवत नाही… पण आईचा आग्रह आहे कि तो ५१ च आहे. आमच्या घरासमोर मोठं मैदान आहे. या मैदानावर आम्ही खेळत असू. नावाप्रमाणेच आमच्या कॉलनीत अष्टविनायकाचे मंदिर आहे. घरासमोर गणपतीच मंदिर असावे असे बाबांना वाटायचे. नंतर कळले की बाबानी जेंव्हा हे घर विकत घेतले तेंव्हा त्यानी या मैदानाचा प्लान पहिला होता आणि त्यांना सोसायटीने सांगीतले होते की इथे पुढे मागे मंदिर होणार आहे. (आता अष्टविनायक नगर आणि ५१ नंबरचे घर काही लिंक लागते का?! पण आमच्या भागाच्या तहसील मध्ये तो नंबर काही सापडला नव्हता! :))

हे आमच्या मालकीचे पहिले घर. त्याआधी आई बाबा नोकरीच्या गावाला इकडे तिकडे फिरत होते. पण जेंव्हा एका जागी स्थिरावण्याचा निर्णय झाला तेंव्हा आम्ही सोलापूराहून नांदेडला शिफ्ट झालो. माझे आजी आजोबा नांदेडलाच राहायचे पण ते जुन्या नांदेड भागात. बाबांचे शालेय आणि कॉलेजचे शिक्षण नांदेडलाच झालेले. हे नवीन घर मूळ शहरापासून खूप लांब होतं. आम्ही इथे राहायला आलो तेंव्हा या भागात फारच तुरळक वस्ती होती. त्या वेळी आमच्या घराच्या चारही बाजूचे एकही प्लॉट विकलेले नव्हते. त्यामुळे आमचे घर आहे त्याच्या पेक्षा मोठे वाटायचे. बाहेरून बघतानाच या घराचे वेगळेपण दिसून यायचे. याची उतरत्या छपराची गच्ची सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायची. बाहेरून जसे हे घर वेगळे होते, तसे ते आतून पण खूप वेगळे होते. या घराचे design बाबांनीच एका आर्किटेक्टच्या मदतीने केले होते. पहिले सरप्राईज तुम्हाला दारातच मिळायचे… आमच्या घरात इलेक्ट्रिक बेल च्या एवजी दारात मंदिरातली घंटी होती. या घंटीने आमच्या घराला एक पवित्र फील दिला होता. या घराच्या भिंतीवर जगातले मोठे लेखक, दिग्दर्शक, लता मंगेशकर यांच्या सोबतीने जी. ए. ची मुग्धा आणि बिम्म आमच्या सोबत इतरांच्या स्वागतासाठी आतुर असायचे. ही सगळी चित्र बाबा क्षमामाई आणि राणीताईने स्वत: काढलेली होती. आमच्या घराचे आणखिन एक वैशिष्ट्य म्हणजे बाबांची ग्रंथ संपदा! आमच्या कडे मराठी, इंग्रजी आणि रशियन साहित्यातील उत्तमोत्तम ग्रंथ होते. हे सर्व ग्रंथ बाबांनी स्वत:च्या कमाई मधून घेतलेले होते. बाहेरच्या दारातून आत आले कि दोन मोठे हॉल आहेत. वरच्या हॉलच्या एका बाजूला स्वैंपाक घर तर एका बाजूला दोन बेडरूम. वरच्या हॉल मधूनच गच्चीत जाणारा जिना. या जिन्यावरून वर गेलं कि एक छोटी खोली बनवली होती जी कि आमच्या दोन गच्च्यांना जोडायची. ही खोली बाबांसाठी अभ्यासिका म्हणून केली होती. (पण ही खोली बाबांनी अभ्यासिका म्हणून खूपच कमी वापरली. त्यांना काम करताना आमचा धिंगाणा व्हाईट नोईज म्हणून लागायचा आणि वरच्या खोलीतून सारखे खाली वर करावे लागायचे.)

मोगरा फुलला!!!
मोगरा फुलला!!!

आम्ही जेंव्हा नांदेडच्या घरी राहायला गेलो तेंव्हा आई बाबांनी मोठ्या हौसेने घराभोवती बाग तयार केली होती. आमच्या बागेत गुलाब, मोगरा, मधु मालती, जास्वंद, (चमेली म्हणून आणलेली!) तांबड्या फुलांची वेल, पारिजात, इंग्लीश झेंडू, स्वस्तिक आणि मागच्या परसातला चाफा अशी निरनिराळी फुलांची झाडे होती. मोगऱ्याच्या हंगामात तर टोपली भरून फुल निघायची. मी, आई आणि माझी मैत्रिण मनीषा अशा तिघी जनी मिळून जरी फूल खुडली तरी घंटा दोन घंटा सहज जायचा!  मग आई अष्टविनायक मंदिरातल्या सगळ्या गणपतींना हार करायची. तीच गत जास्वंदीची. आली कि शंभर फुले यायची या झाडाला! मधु मालतीचा वेल त्या काळी फक्त आमच्या घरी होता. त्याच्या पुढच्या पावसाळ्यात या झाडाची कितीतरी रोपं आम्ही आमच्या शेजार्‍यांना वाटली होती. त्याची लांब देठाची रंग बदलणारी फूलं मला खूपच आवडायची. ही फूलं आधी उमलल्या-उमलल्या पांढरी दिसतात, मग ते फिकट गुलाबी रंगांची होणार आणि नंतर लाल किंवा राणी कलरची ! चमेलीच्या वेलीची मात्र गम्मतच झाली होती. आम्ही चमेलीचे रोप नर्सरी मधून आणले होते. समोरच्या पोर्चवर ती सोडता येईल म्हणून तिला चांगल्या ठिकाणी लावले पण! काही दिवसांनी ते रोप मोठे व्हायला लागले. एके दिवशी त्याला कळ्या दिसायला लागल्या. आम्हाला उत्सुकता वाटली. पण त्या कळीचा आकार काही चमेली सारखा नव्हता. एक-दोन दिवसात जे फुल उमलले ते चांगले होते पण चमेली मात्र नक्कीच नव्हते! ते आमचे तांबड्या फुलांचे झुडूप लोकांना मात्र फार आवडते. बाबांना गुलमोहोर खूप आवडतो मग आमच्या बागेत गुलमोहोर आला. हा गुलमोहोर उन्हाळ्यात मस्त लाल बुंद फुलांनी नटून जायचा. नांदेडला मागच्या काही वर्षापासून पाण्याचा फार मोठा प्रोब्लेम आहे. उन्हाळ्यात पाणी खूप कमी येते. आम्ही लहान होतो तेंव्हा नळाला पाणी आला कि त्या दिवशी तांब्या-पेला सहित सगळ्या भांड्यात पाणी भरून ठेवायचो. आम्ही भावंड जेंव्हा नांदेडला होतो तेंव्हा टॅंकरने पाणी यायचे. हा पाण्याचा टॅंकर सकाळी ४ ते रात्री बारा या दरम्यान कधीही यायचा. टॅंकर आला की भोंगा वाजायचा मग कॉलनी मधले सगळे कळशा बादल्या आणि पाणी ओढण्यासाठी पाईप घेऊन पळायचे. ते पाणी एका मोठ्या drum मध्ये भरायचे आणि तिथून पुन्हा घरी आणायचे. या  टॅंकरचा आम्ही इतका धसका घेतला होता की गोविंदा टॅंकरचा आवाज आला की तटकन झोपेतून दचकून जागा होणार आणि पाईप घेऊन पळायचा! आता फक्त आई बाबा असल्याने ते भागवून घ्यायचे, पण पाहुणे येणार म्हणाले कि नळाला कमी आणि आईच्या डोळ्यातच जास्त पाणी यायचे! हळूहळू आम्ही सगळे बच्चे कंपनी चार दिशांना पांगलो. राणी ताई मुंबईला, क्षमा माई आधी पुणे मग हैदराबाद मग पुन्हा पुण्यात, मी आणि गोविंदा अमेरिकेत! आता फक्त आई आणि बाबा नांदेडला राहत होते. राणी ताईची मुलगी लहान असल्याने तिला मदत म्हणून मग ते सहा महिने मुंबईत राहायचे आणि सहा महिने नांदेडला. अशाने नांदेडच्या घराची आबाळ होऊ लागली. नांदेडला वापस आल्यावर आईला निदान एक आठवडा लागायला लागला रुटीन लागायला. मध्ये काही वर्षाखाली आम्ही घर भाड्याने देऊन पहिले होते. पण आमच्या भाडेकरूनी आमच्या घराचे गोडाऊन करून टाकले होते. 402593_10152739714890438_816277807_nआमच्याकडे हौशीने लावलेली झाडे आता मोठी-मोठी झाली आहेत. त्यांच्या पानांचा कचरा बराच होतो. बाहेरच्या अंगणाची सफाई करायला कोणी मिळेना झाले होते. आईचा दिवस या सगळ्या कामात कसा निघून चालला तेच कळेनासे झाले. बाबांचे पण वरचे वर मुंबई पुण्याला कामानिमित्त जाणे चाललेले असायचे. पुणे त्यांना मध्यवर्ती होईल. क्षमा माई आणि राणी ताईच्या जवळपास राहण्यासाठी शेवटी त्यांनी नांदेड सोडण्याचा निर्णय घेतला. आई मला आम्ही हे घर सोडून पुण्याला चाललो आहोत हे सांगायचेच विसरली! म्हणजे आज काल तिचे असेच होते. अर्थात त्यात तिचा काही दोष नाही. आम्ही चार भावंड तिला चार दिशांनी फोन करत असतो मग कुणाला काय सांगीतलं ते तिला लक्षात राहत नाही. मग एखादी गोष्ट एकाला तीनदा सांगितली जाते तर एखाद्याला ती सांगितलीच जात नाही. मी मा‍झ्या सासूबाईंना बोलताना त्या मला म्हणाल्या. मला एकदम आठवलं कि लहान असताना आम्ही नांदेड सोडून उदगीरला दोन वर्षासाठी गेलो होतो. तेंव्हा मला प्रचंड वाईट वाटलं होतं. या वेळेस मात्र मा‍झ्या मनात या विषयी मिश्र भावना आहेत. साहजिकच दुख झालं पण वरची सगळी कारण पण मला माहित असल्याने थोडे फार बरे पण वाटले.

सूर्य!
सूर्य!

माझे एक आवडते इंग्लीश सिरीयल आहे. North and South या नावाचे. हे सिरियल याच नावाच्या कादंबरी वर आधारित आहे. या कादंबरीची नायिका मार्गारेट तिचे गाव सोडून शहरात येते. इथे असताना सतत तिला आपले गाव आणि तिथले घर याची आठवण येत असते. कादंबरीच्या शेवटी जेंव्हा तिला परत तिच्या गावाला जाण्याची संधी मिळते तेंव्हा ती अतिशय आनंदी होते. प्रत्यक्षात जेंव्हा ती तिथे जाते तेंव्हा मात्र तिच्या पदरी निराशाच येते. ती ज्या घरात रहायची त्या घराचा आता सगळा चेहराच बदललेला असतो. त्यांची बाग आता राहिलेली नसते. घरातल्या आतल्या रचनेत नव्या मालकाने फेरबदल केलेले असतात. पण या भेटीत तिला जाणवते की फक्त बाह्य बदलामुळे ती नाराज झालेली नाही पण या दरम्यान तिच्यातही अनेक बदल झालेले असतात. ज्या गोष्टींकडे ती पूर्वी प्रेमाने बघायची त्या गोष्टींकडे सापेक्षपणे बघण्याची तिच्याकडे क्षमता आलेली असते. मी नांदेडहून निघाली त्याला आता ७ वर्ष झाले आहेत. मध्ये एकदा २०१० मध्ये भारतात आले होते पण तेंव्हा आई बाबा मुंबईला राणी ताई कडे होते. आता आई बाबा जिथे तिथेच माहेर! नांदेडला जाण्याची इच्छा होती पण २०-२२ दिवसात काय-काय करणार! आता आमचे घर पण खूप बदलले आहे. बाबा सांगत होते घराच्या बाजूच्या प्लॉटवर मोठे-मोठे घरं झाले आहेत. ….नांदेडला जाणे झालेच नाही हे एका अर्थाने बरेच झाले. सकाळचा चहा पीत हॉलच्या पायरीवर बसलेले आई बाबा, दारातली घंटी, परसात दरवळणारा मोगऱ्याचा सुवास, समोरच्या अंगणातला फुललेला लालबुंद गुलमोहर, हापूस आंब्याचे कैर्यांनी भरलेले झाड यांची मा‍झ्या मनातली छबी मला चिरंतन जपता येईल!

Advertisements

8 thoughts on “राहिले रे दूर घर माझे…!

Add yours

  1. घर कसही असो, घराबद्दलची आपुलकी आणि जिव्हाळा प्रत्येकाच्या मनात असतोच. एवढा काळ लोटून गेला असला तरी तुम्हाला एवढे सगळे आठवते आणि ह्या आठवणीना तुम्हाला उजाळा द्यावासा वाटला याचं कातुक वाटतं. खरच छान वाटले वाचून.

  2. Reblogged this on सातारकरांचा ब्लॉग and commented:
    घर, ज्याना स्थिर घर मिळत त्यांच्यासाठी, जिव्हाळ्याची गोष्ट. त्यातही आपण वयात येताना ज्या ठिकाणी राहिलेलो असतो त्या आठवणी जन्मभर साथ देतात.

    1. Thanks! This story is about my home where I grew up in India. My parents recently moved to another place so I was feeling nostalgic! It’s so touching that even though you don’t understand Marathi you got the gist of it. Thanks again.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: