मी माझ्या बाबांसारखी!

अंजली ताईने फेसबुकवर मेसेज केला…नयन काकांना contact कर लगेच आणि त्यांना Whats app वर add कर!  भारतातून अवेळी मेसेज आला कि मला मनात चर्र होतं. लागलीच Whats app वर मेसेज केला. काकांचा माझ्या रात्री मेसेज आला, ” अम्मू, आई बाबा नांदेडहून पुण्याला शिफ्ट होत आहेत म्हणून आम्ही बाबांचा निरोप समारंभ आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने एक मी पुरवणी काढतो आहे. तू एक लेख लिहितेस का? अंजली ताईने तुझे नाव सुचवले. लिहितेस का? बाबांना आपण surprise देऊ. कोणालाही सांगू नकोस! ” बापरे…लेख आणि मी! बर म्हणलं आता आपण लिहायला लागलो आहोत मग काय लिहुत मस्त! सकाळ पर्यंत मेसेज पाठवला “हो, लिहिते.” त्यावर काकांचे उत्तर “२४ तारखेपर्यंत पाठव. “

त्यादिवशी १५ तारीख होती. म्हणल आहे वेळ…लिहू…आठवडा गेला काहीही सुचेना. मग म्हणल झाल कसलं काय..आपल्याला एक सांगितलेलं काम करता येत नाही. सकाळी उठून बघते तर काकांचा मेसेज “काय अम्मुताई लिहिलं का काही?” माझ्या डोळ्यातून खळकन पाणीच आला. “मला काही सुचत नाही काका! जमतच नाहीये, आज दिवसभर विचार करते आणि हो का नाही ते तुमच्या सकाळ पर्यंत सांगते.” काका म्हणाले ” ओके पण मला स्पष्ट सांग!” म्हणाले खर आजचा दिवस विचार करते..पण खूपच काम लागले…घरी आल्या आल्या निकराने laptop घेऊन बसले आणि जसं मनात आल तसे लिहून काढले…ठरल्याप्रमाणे काकांना सकाळी पहिला ड्राफ्ट पाठवला.

बाबांना surprise देण्यासाठी लिहिलेला हाच तो लेख!

बाळ जन्मल्यानंतर ते मोठ होई पर्यंत त्याची तुलना त्याच्या आई बाबाशी होत असते. “अगदी तुझ्यासारखा दिसतो बघ”, किंवा “हसल्यावर त्याच्या बाबांसारखा दिसतो” असे प्रत्येक नातेवाईक कौतुकाने सांगत असतात.  तो पर्यंत फक्त दिसण्यावरून तुलना होत असते. मग थोडं मोठ झालं कि बाळाचे पाय पाळण्यात दिसायला लागतात आणि त्याच्या आवडी निवडी नुसार आई किंवा बाबावर ‘गेलाय’ असे ऐकायला मिळते. आमच्या घरी मी लहानपणापासूनच ‘आईसारखी’. क्षितीज आणि क्षमा माई बाबांवर गेलेले. क्षितीज तर बाबांचा कॉपी पेस्ट आणि क्षमा माईच्या सगळ्या आवडी निवडी बाबांच्या.  राणीताई बाबत मात्र  ‘दोन्ही’ गटांना वाटे कि ती आपल्यासारखी आहे  🙂 . मी मात्र नेहमीच आई सारखी! हे चित्र बदलायला लागलं ते मागच्या दोन वर्षांपासून!

मी आणि बाबा
मी आणि बाबा

झाले असे कि मी नेहमीप्रमाणे या सेमेस्टरला कोणते विषय घ्यावे याचा विचार करत होते. मी माझे मास्टर्स टेम्पल युनिवर्सिटी मध्येच केले असल्याने आणि आता त्याच डिपार्टमेंट मध्ये पीएचडी करत असल्याने, माझ्या डिपार्टमेंट मध्ये शिकवले जाणारे सगळेच कोर्स मी घेतले होते. एक विषय राहिला होता पण तो घेण्याची (आणि नशिबाने तो ऐच्छिक विषय असल्याने )अजिबात इच्छा न्हवती. आजू- बाजूच्या डिपार्टमेंट मध्ये चोकशी केली असता एक आणखी कोर्स आहे असे कळले. विषय चांगला होता. नेहमीच्या पठडीतला अभ्यासक्रम नव्हता, शिकवणाऱ्या बाई अत्यंत उत्साही आणि हुशार म्हणून सगळीकडे प्रसिद्ध. एवढे सगळे चांगले असले तरी एक गोची मात्र होती. या कोर्स साठी मला ब्लॉग लिहावा लागणार होता आणि तो पण दर आठवड्याला आणि इंग्रजीत ! एकीकडे न आवडता कोर्स आणि एकीकडे अवघड कोर्स अशी माझी अवस्था झाली. इकडे आड तर तिकडे विहीर! म्हणल जे आवडत नाही ते करत बसण्यापेक्षा नवं  काही तरी ट्राय करूया आणि जास्त विचार न करता सरळ त्या दुसऱ्या (ब्लॉग वाल्या ) क्लासला अडमिशन घेऊन टाकले! तो माझ्या आयुष्यातला सर्वात चांगला निर्णय होता! माझी ओळख बदलणारा!

अडमिशन घेऊन सगळ संपत नाही… ती तर सुरुवात होती. खरे सांगू का आता मागे वळून बघतांना सगळे सोपे वाटत असले तरी सुरुवातीला माझी अगदी पाचावर धारण बसली होती. म्हणल काय वाढून ठेवलं आहे समोर काय ठावूक! नापास झाले नाही म्हणजे नशीब! जरा दबकत दबकतच पहिला ब्लॉग लिहिला. त्या ब्लॉगला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. मग थोडी भीती चेपली. पुढे कोर्स संपेपर्यंत नियमित लेखन केले. हे सगळे लिखाण अभ्यास विषयक होते. एखादी scientific concept घ्यायची आणि त्याच्या अनुशंघाने गोष्ट लिहायची जेणेकरून तो concept सगळ्यांना कळेल असे काहीसे स्वरूप असणार होते या ब्लॉगचे. परीक्षा म्हणजे हे सगळे ब्लोग असल्याने दर आठवड्याला नियमित लिहिले.  पण या क्लासच्या निमित्ताने माझ्यात आणि बाबात एक नवा धागा तयार झाला. आत्ता पर्यंत क्षमा माई, राणी ताई यांच्याशी त्यांच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा चालायच्या. माझा त्यात क्वचितच सहभाग असायचा.  पण हे बाबा माझ्यासाठी वेगळेच होते. माझे प्रत्येक लेख ते वाचायचे. त्यावर प्रतिक्रिया द्यायचे. माझे लिखाण आणखिन कसे चांगले होईल याबद्दल सुधारणा सुचवायचे. मनापासून आवडलं की शाबासकी द्यायचे. माझी स्वत:ची शैली विकसित करण्यात मला त्यांनीच मदत केली. त्यांचा असा आग्रह आहे कि मी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत लिहावे.

क्लास संपल्यावर आता माझ्यावर काही कंपल्शन नव्हते लिहिण्याचे. पण एका नंतर एक गोष्ट सुचत गेली.  क्लास चालू असताना एकाच विषयावर लिहायचे पण आता तशीहि  काही अट नव्हती. मग बाबांनी मला काय लिहायला आवडेल आणि लोकांना माझ्याकडून काय वाचायला आवडेल याचा विचार करायला सांगितले. आम्ही पाडळकर लोक एकदम खाण्याचे शौकीन! मग एक सेग्मेंट आठवणीतल्या पदार्थावर लिहू लागले. तसे पहिले तर रेसिपी सांगणारे खूप ब्लॉग असतात. पण त्यातही वेगेळेपण कसे जपायचे या बद्दल बाबांनी सूचना केल्या. बाबांकडून मिळालेली आणखिन एक आवड म्हणजे पुस्तकं आणि चित्रपट. मग साहजिकच त्यांच्यावर लिहिणे सुरू झाले.  हळूहळू जाणवायला लागले कि हे आपल्याला खूप आवडते आहे. या आधी मी कधीच लिहिण्याचा प्रयत्न केला नव्हता. माझी मजल जास्तीत जास्त फोटोंना कॅप्शन देण्यापर्यंत होती. तसे परीक्षेत ठराविक पठडीतले निबंध लिहिले होते पण लिहिणे आपल्याला आवडेल असे कधीच वाटले नव्हते. तसं पाहिलं तर लिहिणं मला का आवडायला लागलं हे सांगणे जरा कठीणच आहे. मला वाटतंय लिहिण्यामुळे मा‍झ्यात आणि बाबात जो धागा निर्माण झाला तो मला जास्त आवडायला लागला. सुरुवातीच्या दिवसात मला वाटत त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि मा‍झ्या विषयीचा अभिमान मला लिखाण चालू ठेवण्यास प्रेरित करत असावा असे मला वाटते.

आता सगळे बदलल्यासारखे वाटते आहे ! फेसबुकवर जेंव्हा मी माझा ब्लॉग शेयर करते तेंव्हा आता लोक म्हणतात कि मी माझ्या बाबा सारखी आहे. होय तीच माझी नवी ओळख!  खरेच असे असते का? आपल्याकडे राजकारण्याची मुलं राजकारणी, नटाची मुलं नट होतात.  पण लेखकाची मुलं लेखक होतात का? लेखनाचे कोणते गुणसूत्र (genes) आहे का ?  कधी अचानक डोक्यात नवा विषय यायचा. प्रचंड बेचैन वाटायचं. मग रात्र भर जागून ते पानावर उतरवल्यावर शांत वाटायचे. मग हातात कुठल्याही कागदाचा तुकडा आला तरीही चालायचं. लहानपणी आई म्हणायची, बाबा पण असेच करायचे. कुठे निमंत्रण पत्रिकेचा कोरा भाग घेऊन लिही तर कधी तिकीट! त्यांना काहीही चालते. एकदा कटिंग करतांना त्यांच्या डोक्यात काही तरी आले आणि ते विसरू नये म्हणून त्यांनी जवळच्या वर्तमानपत्राचा कोरा भाग कापून भराभर ते लिहून काढले आणि तो कटिंग वाला त्यांच्याकडे बघतच राहिला.

क्लास संपत आला तेंव्हा अचानक एके दिवशी माझ्या टीचरने मला इमेल केला. त्यात त्यांनी मला सांगितले कि “मला तूझे ब्लॉग खूप आवडले आणि क्लास संपल्यानंतर देखील तू लिहित राहावे अशी माझी इच्छा आहे”. त्या दिवशी मी त्यांना मोठ्या अभिमानाने इमेल केलेला मला अजूनही आठवतोय. मी त्यांना म्हणाले होते कि माझे बाबा लेखक आहेत आणि बहुतेक माझ्यात हे गुण त्यांच्याकडूनच आले असावेत. बाबा मला पण लिहायचे आहे, आनंदासाठी! व्यक्त होण्यासाठी. तुमच्या सारखे! मनस्वी तरीही अभ्यासपूर्ण! कोणत्याही चाकोरी मध्ये न मोडले जाणारे.

..लहानपणी  एकदा तुमचे बूट घालून चालण्याचा (निष्फळ) प्रयत्न केल्याचे आठवते बाबा, आता पण तेच करते आहे… पण खरे सांगू का तुमच्या बुटाचा नंबर ना जरा जास्तच मोठा आहे!

-मुग्धा पाडळकर कुलकर्णी (1+1=11)

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: