पिठलं भाकरी

bhakari pithale
भाकरी पिठले

कशी गम्मत असते ना, कोणाच्या मनात कशासंदर्भात काय असोसिएशन असेल याचं काहीच सांगता येत नाही. आता माझेच बघा ना. पिठलं भाकरी म्हणालं कि मला पहिली गोष्ट काय डोळ्यासमोर येत असेल तर ती सिनेमातली, विशेषतः मराठी सिनेमातली, भाकरी पिठल्याची दुरडी डोक्यावर घेऊन ठुमकत येणारी शेतकऱ्याची बायको! हा हा आहे न गम्मत! शेतकरी उन्हात काम करत असतो आणि त्याला ती आलेली दिसते. मग तो घाम पुसतो, हात -पाय धुतो आणि जेवायला येऊन बसतो आणि म्हणतो” काय कडाडून भूक लागली बुवा!” आणि मग हाताच्या बुक्कीने कांदा फोडून (मला या प्रकाराचे पण खूप कौतुक वाटायचे !) मस्त भाकर आणि कोरडं पिठलं खातो. अहाहा! हे पाहून  मला पण मग कडाडून भूक लागल्याची भावना होणार. लहानपणी भाकरी पिठलं म्हणल कि गरीब लोक किंवा शेतकरी अशीच माझी असोसिएशन्स होती पण त्याला चांगलाच तडा बसला जेंव्हा आम्ही उदगीरला गेलो! झाले असे कि उदगीरला बाबांची काही जवळपासच्या लोकांची ओळख झाली होती. त्यातील काही लोकांनी मिळून एका ऑफिसर्स क्लबची स्थापना केली होती. या क्लबमधील लोक आणि त्यांची फमिली असे मिळून काही कार्यक्रम करत असत. जसे कि नवीन वर्षाचे स्वागत, किंवा दिवाळी किंवा संक्रांत वगैरे वगैरे! मी आई बाबांसोबत एकदा नवीन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमाला गेले होते. सगळ कसं झकपक, नेटका कार्यक्रम. आणि जेवायला घेण्याची वेळ आली तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. जेवणाचा मेनू चक्क पिठलं आणि भाकरी! काय सांगता एवढ्या मोठ्या कार्यक्रमात पिठलं भाकरी…तेंव्हा तिथल्या कार्यक्रम अरेंज करणाऱ्या काकू  म्हणाल्या” अगं घरी पोळी खाऊन कंटाळा येतो मग इथे काही तरी बदल जरासा!”

पिठले भात

आपल्याकडे पारंपारिक पदार्थ करण्याची पद्धत घरोघरी थोड्याफार फरकाने सारखीच असते. आता पिठल्याचेच बघा ना… पिठल्याची साधारण कृती म्हणजे, एका कढईत फोडणी करून, कांदा, लसून, हिरवी मिरची  आणि कढीपत्ता परतून घ्यायचे. त्यात पाणी टाकून मीठ आणि हळद टाकायचे. एका छोट्या भांड्यात बेसन आणि पाण्याची एकसारखी पेस्ट करून घ्यायची. आता कढईतील पाण्याला उकळी आली कि त्यात हि पेस्ट हळूहळू टाकायची. बेसन टाकताना सतत ढवळायचे नाही तर बेसनाच्या गुठळ्या होतात. आता बेसन शिजले कि त्यात भरपूर कोथिंबीर टाकायची. आणि गरमागरम भाकरी किंवा भात याबरोबर खायला द्यायचे. हि झाली बेसिक कृती! आता या कृतीत घराघराप्रमाणे थोडाफार फरक असतो. जसे कि काही जन पिठल्यात शेंगदाण्याचे कुट टाकतात. काही जण आंबट चव यावी म्हणून ताक टाकून पिठले बनवतात. कोणाकडे बेसनाची पेस्ट न टाकता सरळ तसेच बेसन टाकतात. काही जन तव्यावरचे पिठले बनवतात म्हणजे आजच्या भाषेत instant पिठले! लहानपणी मी आई सोबत गजानन महाराजांच्या मंदिरात जात असे. तेथे पिठले आणि भाकरी असा नैवद्य असायचा. एकदा मी गजानन महाराजांच्या जयंतीच्या वेळेस आमच्या कॉलोनितल्या सर्व काकू आणि आई सोबत गेलेली असताना मी प्रत्येकाने आणलेली भाकरी आणि पिठले चाखून पहिले होते. करण्याची पद्धत तर वेगळी असतेच शिवाय प्रत्येकाच्या हाताची चव पण वेगळीच!

IMG_0821
सिंहगड २००६

सिंहगड, माथेरानच्या  वाटेत किंवा माथ्यावर गेलं कि मस्त पिठलं भाकरी, लसणाची चटणी, ताजे दही, कांद्याचे तिखट आणि कांदा भजी असे जेवण मिळते. काही वर्षापूर्वी मी, राणीताई, सई, तिची आई, शंतनू आणि क्षमामाई सिंहगडावर गेलो होतो. काही दुरुस्तीच्या कारणास्तव गडाचा मुख्य रस्ता बंद केला होता. म्हणून मग आम्ही आमचा मोर्चा गडाच्या कच्चा रस्त्याकडे वळवला. तेंव्हा साडे तीन -चार वाजले असावेत. जसे जसे वर जायला लागलो तसे परत येणारे आम्हाला, पुढे अंधार आहे आणि गड अवघड आहे, आता जाऊ नका असे सांगायला लागले. एवढ्या दूरवर येऊन  गड न बघता परत जाण्याची कोणाचीच इच्छा नव्हती. मग आजूबाजूला थोडी चौकशी केली तर कळले कि इथे एका रात्रीसाठी राहायला जागा मिळू शकते. मग आम्ही रात्रीचा मुकाम करायचे ठरवले. राहण्याची सोय तर झाली पण आता जेवणाचे काय? असा विचार करत असतानाच त्या जागेचे मालक आले आणि त्यांनीच जेवणाची चौकशी केली. मला अजूनही आठवते, जेवणासाठी त्यांनी भाकरी, पिठलं, लोणचं कांद्याचे भजे असा मस्त प्लान केला होता. त्यादिवशी चांदण्यात बसून मनसोक्त पिठलं भाकरी खाल्लेली मला जसेच्या तसे आठवते. आधीच चविष्ठ असलेले जेवण घरमालकाने अगदी आग्रहाने खाऊ घातल्याने सगळे जन एखादी भाकरी जास्तच जेवले!

शेपूची भाजी आणि भाकरी! (फोटो: प्राची आणि क्षितीज :))
शेपूची भाजी आणि भाकरी! (फोटो: प्राची आणि क्षितीज :))

तुम्ही जर माझा ब्लोग नेहमी वाचत असाल तर तुम्हाला माझे भाकरी प्रेम आणि ती इथे नेहमी मिळत नसल्याची हुरहूर तर माहित असेलच! 🙂 गरम भाकरी आणि त्यावर तूप आणि मीठ हे तर माझे जीव कि प्राण. तसचं शिळी भाकरी आणि झणझणीत भुरका! तोंडाला पाणी सुटला न! 🙂 भारतातून कुणीही येणार असलं कि माझी भाकरीच्या पिठाची फर्माईश असते. मग एक दोन आठवड्यात त्याचा फडशा पाडला जातो. इथे फिलाडेल्फियाला भाकरीचे पीठ काही चांगले मिळत नाही. आजू बाजूला हॉटेल्स असली तरीही सगळ्या हॉटेल्स मध्ये पंजाबी जेवण मिळते भाकरी काही लांब पर्यंत मिळत नाही. मी एका conference च्या निमित्ताने San Francisco ला गेलेली असताना क्षितीजकडे जाण्याचा योग आला. कॅलिफोर्निया भागात बरेच मराठी लोक राहत असल्याने इथे काही अस्सल महाराष्ट्रातील पदार्थ खायला मिळतात. तिथे एके ठिकाणी  मुंबईतल्या सारखा बटाटा वडा मिळतो. त्याच हॉटेल मध्ये भाकरी आणि पिठलं पण मिळते. मी येणार म्हणाल्यावर त्याने मला पहिल्यांदा तिथेच नेले. पिठलं जरी अस्सल घरच नसल तरी भाकरी मात्र छान होती. आता त्यांच्या कडे कोणीही आला कि तो आणि प्राची त्यांना पिठलं भाकरी आणि बटाटा वडा खायला तिथेच घेऊन जातात.

जर बाजरीची भाकरी तुम्हाला आवडत असेल तर हा लेख नक्कीच वाचा!

https://mugdhapadalkar.wordpress.com/2014/12/12/%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: