उबदार आठवणी

आपल्याकडे कोणत्या ऋतु मध्ये काय खायचे याचा किती सविस्तर विचार केला आहे याचे मला फार कौतुक वाटते. थंडी सुरू झाली की ऊब मिळण्यासाठी तीळ गूळ, बाजरी यांचा आपण आपल्या जेवणात समावेश करतो तर ऊन वाढलं की कैरीची चटणी, ताक अशा थंडावा देणार्‍या गोष्टी समाविष्ट करतो. संक्रांतीला भोगीला आपल्याकडे बाजरीची तीळ लावलेली भाकरी करतात आणि त्याबरोबर मिक्स भाजी. माझे नाना (बाबांचे वडील ) खाण्याचे मोठे शौकीन होते. प्रत्येक ऋतुतील भाज्या, फळे ते नेहमी आणायचे. हिवाळा आला की बाजारातून बाजरी घेऊन यायचे. मग त्यांची बाजरीच्या भाकरीची फर्माईश असायची. बाजरीची भाकरी, बरोबर हरभर्‍याच्या पानांची झणझणीत पातळ भाजी केली की मस्त मिटक्या मारत जेवायचे. जेवायला छान मिळाल की त्यांची स्वारी खुष असायची.

बाजरीची तीळ लावलेली भाकरी तर बरेच जन करतात पण तुम्ही कधी बाजरीची गोड भाकरी केली आहे का? हो बरोबर वाचलात तुम्ही. गोड भाकरी 🙂 आम्ही जरा गोड्घाशेच आहोत. बाजरीचे पीठ ज्वारीच्या पीठापेक्षाही लवकर खराब होते. खराब म्हणजे चवीला कडू होते, भाकरी वळत नाही. मग बाजरी दळून आणली की आई दोन प्रकारच्या भाकऱ्या बनवायची. साधी भाकरी आणि बाजरीची गोड भाकरी. गूळाच्या पाण्यात भाकरीचे पीठ भिजवायचे आणि जसे नेहमी बनवतो तशा भाकऱ्या बनवायच्या आणि गरम भाकरी बरोबर चमचाभर तूप किंवा लोण्याचा गोळा द्यायचा. अ.प्र.ति.म! मग सोबत काही नसेल तरी चालेल! ही भाकरी शिळीच जास्त  छान लागते. एक मात्र करावे लागते की भाकरी भाजताना ती मंद आंचेवर भाजायची. कारण या भाकरीत गूळ असल्याने ती करपट बनू शकते आणि मग कडू लागते.

बाजरीचा आणखी एक आवडता प्रकार म्हणजे बाजरीचा खिचडा. आई हिवाळ्यात बाजरीच्या भरडीची खिचडी बनवायची. हा प्रकार मसालेदार कॅतेगोरी मध्ये मोडला जाणारा आहे.  राजस्थानात बाजरीचे पिक जास्त होत असल्यामुळे तेथे हा प्रकार जास्त famous आहे.  बाजरीची खिचडी वर बारीक चिरलेला कांदा, कोथिम्बिर आणि तूप किंवा ताक टाकून खायला छान लागते.

उन्हाळ्यात आई बऱ्याच प्रकारचे वाळवण करायची. बटाट्याचे चिप्स, साबुदाण्याचे पापड, गव्हाच्या कुरोड्या आणि पापड. त्यातला एक प्रकार म्हणजे बाजरीच्या खारोड्या. आई सकाळी -सकाळी खारोड्या पीठ शिजून ठेवायची आणि ऊन चढायच्या आत आम्ही गच्चीवर या पीठाच्या छोट्या- छोट्या खारोड्या बनवायचो. दिवसभर उन्हात त्या वाळल्या की संध्याकाळी त्या पालटायचो. मला ते फार आवडायचे. अर्ध्या ओल्या अर्ध्या वाळलेल्या खारोड्या खाताना खूप मज्जा यायची. मग एक-दोन दिवस मस्त या खारोड्या उन्हात वाळल्या की आई त्यांना कोरड्या डब्यात भरून ठेवायची. मग एखाद्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस त्यातल्या काही खारोड्या तळून कांदा आणि शेंगदाणे सोबत खायला द्यायची. या खारोड्या कच्च्या पण खूपच छान लागतात.

BajriRotlaइथे अमेरिकेत ज्वारीचे पीठच नीट मिळत नाही तर बाजरीचे पीठ कुठून मिळणार असा विचार करून मी कधी बाजरीच्या पीठाचा शोध पण घेण्याचा प्रयत्न केला नाही. परवा हिवाळ्याची झळ जाणवायला लागली तशी मला बाजरीच्या भाकरीची आठवण आली. इथल्या इंडिअन दुकानात चक्कर मारत असताना फ्रोझन सेक्शन मध्ये चक्क बाजरी का रोटला असे काहीसा दिसलं…आणि मनात आले अरेच्या हे तर कधीच मा‍झ्या लक्षात आलं नाही. इथे खूप गुजराथी लोक आहेत. गुजराती लोकांना सुद्धा बाजरीची भाकरी आवडते. मागे एकदा गुजराती थाळी खायला गेलेली असताना तळहाताच्या आकाराची बाजरीची भाकरी आणि गूळाचा खडा दिल्याचे आठवले. जरा दबकतच ते पाकीट विकत घेतलं. काय माहिती कसे लागणार… फ्रोझन  बाजरीची भाकरी. घरी आल्यावर पहिल्यांदा पाकिट बाहेर काढून ठेवलं. उघडून पाहीलं तर आत थापलेल्या न भाजलेल्या भाकऱ्या होत्या. भाकरी डीफ्रोस्त करून नेहमी जशी करतो तशी तव्यावर गरम केली. इथे आल्यापासून तब्बल ७ वर्षांनी पहिल्यांदा भाकरी खाल्ली. आता मला माहीत आहे की निदान इथे बाजरीची भाकरी तरी मिळते. फ्रोझन तर फ्रोझन…ते ही नसे थोडके 🙂

Advertisements

4 thoughts on “उबदार आठवणी

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: