…अंतर्यामी सूर गवसला!

पेटी

तिसरी चौथीत असताना माझी एक मैत्रिण होती, श्रुती. आमच्या घराच्या जवळ रहायची. जवळ म्हणजे तिच्या आणि मा‍झ्या कॉलनीतून एक पाण्याचा कॅनॉल जायचा. कॅनॉल ओलांडला की पहिले घर तिचेच. ती आणि मी एकाच शाळेत जायचो. खेळायला कधी तिच्या घरी तर कधी मा‍झ्या घरी.  एकदा मी तिच्या घरी गेलेली असताना ती आणि तिची आई कुठे तरी जाण्याच्या तयारीत होते. चौकशी करताच कळले की त्या दोघी श्रुतीला गाण्याच्या क्लास मध्ये टाकण्यासाठी जात होत्या. मला पण गाणे म्हणायला, नाचायला आवडायचे. घरी मला सगळे नटी म्हणायचे! मी म्हणाले “मला पण जायचे आहे गाण्याच्या क्लासला!”. मग काकू आम्हाला दोघींना घेऊन जवळच्या जिल्हा परिषद कॉलनीतल्या रजनी पप्पू यांच्या गाण्याच्या क्लासला घेऊन गेल्या. क्लासची वेळ कधी, आठवड्यातून किती वेळेस यावे, आणि  महिन्याची फीस काय अशी जुजबी चौकशी केली आणि दोघींचे नाव क्लास मध्ये भरती झाले आणि उद्या सकाळ पासून नियमित यायचे असे ठरले. मस्त उत्साहात उड्या मारत घरी गेले. घरी गेल्या-गेल्या आईला सगळं सांगीतलं तर आई म्हणाली आज कशाला गेलीस आज अमावस्या आहे! चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या दिवशी करावी…तर  मा‍झ्या गाण्याच्या क्लासची सुरुवातच अशी झाली!

पेटी (हार्मोनियम)दुसर्‍या दिवशी सकाळी आठ वाजता मी तयार होऊन गाण्याच्या क्लासला गेले. आधीच्या दिवशी आम्ही बाईंच्या दिवाणखान्यात भेटलो होतो. आज त्यांच्या मुलीने मला क्लासची खोली उघडून दिली आणि आत बसायला सांगीतले. आत चार- पाच पेट्या (हर्मोनियम) व्यवस्थित झाकून ठेवल्या होत्या. एका कोपर्‍यात तंबोरा उभा करून ठेवला होता आणि जवळच तबला आणि डग्गा!  जमिनीवर मोठी सतरंजी टाकलेली होती आणि त्यावर मी जाऊन बाईंची वाट पाहत बसले. ५- १० मिनिटात एक -एक करून नेहमीचे विद्यार्थी यायला सुरुवात झाली. त्यांनी सराईतपणे पेटी घेऊन स्वर लावण्यास सुरुवात केली बघता – बघता ती खोली स्वरांनी भरून गेली पण मला मात्र एकटे वाटायला लागले. मला त्यांचा खूपच हेवा वाटला.  तितक्यात श्रुती आली आणि आम्ही दोघी बाईंची वाट पाहत बसलो. “आलात का गं तुम्ही दोघी?” बाईंचा मागून आवाज आला. आम्ही उठून उभे राहताच आम्हाला त्यांनी बाजूच्या छोट्या खोलीत बोलावले. पेटीवर सा रे ग म प ध नी सा असे वाजवायला आणि ऐकायला शिकवले आणि आमचा गाण्याचा क्लास ऑफिशियली सुरू झाला.

goddess-saraswati-767189रोज नियमितपणे गाण्याच्या क्लासला जाऊ लागले. जिच्या मुळे मी क्लासला जायला लागले त्या श्रुतीने एक दोन महिन्यातच क्लास सोडून दिला होता. पण मला क्लासला जायला खूप आवडायला लागले होते. नवीन मैत्रिणी मिळाल्या होत्या. हळू-हळू स्वर ओळख झाली…एका मागून एक २८ अलंकार शिकले. पेटीवर हात सरावले. पहिला राग शिकला. भूप राग. आत्ता पर्यंतच्या  सगळ्या अलंकारात सातही सूर वापरलेले होते पण या रागात मात्र ‘म’ आणि ‘नी’ वर्ज! गम्मत वाटली. अलंकारात फक्त आलाप होते पण आता राग शिकवताना बाईंनी या स्वरांचा उपयोग करून गाणे शिकवले. “सुरासुरभजत मुनिवर शंकर “ असे बोल असणारी भूप रागातली चीज. पाठोपाठ दुर्गा. (घरी जाऊन सांगीतले तर बाबांची शिफारस बाईंना मालकंस शिकवायला सांग! 🙂 जो कि मी नंतर मध्यमा प्रथम वर्षाला शिकले! ) बाई या रागांची आधी माहिती लिहून द्यायच्या. मग आरोह, अवरोह. कोणते राग सकाळी म्हणतात, कोणते रात्रीचे राग आहे, कोणत्या रागाचा स्वभाव कसा आहे हे कळायला लागले. नेहमीचे रुटीन ठरलेले. गेल्यावर पेटीवर सा-प-सा लावायचे. मग सगळे अलंकार म्हणायचे. जरा कुठे कमी जास्त झालं कि आतून आवाज येणार ” पुन्हा म्हण ‘म’ तीव्र लागतो आहे. तस पाहिजे का इथे?” बाई आत काम करत असल्या तरीही बाईंचा एक कान आमच्याकडेच असायचा.

त्या वेळी क्षितिज तबला शिकायचा. त्याने जेमतेम तीन ताल शिकला असेल आणि मी नुक्तीच राग शिकायला सुरुवात केली होती. आई बाबांच्या मनात आले की आमचा (घरातच) छोटासा कार्यक्रम करावा. तो तबला वाजवेल आणि मी पेटी. ठरल्या प्रमाणे मी रागाची चीज घोटून ठेवली आणि क्षितिजने तबल्यावर प्रक्टिस केली. कार्यक्रम सुरू केला आणि आमची पुरती तारांबळ उडली. खरी गम्मत झाली जेंव्हा आम्ही एकत्र म्हणायला लागलो. या आधी तबल्यावर मी कधीच गाणं म्हणल नव्हत म्हणून मी त्याला म्हणल की दोघंही एकदम सुरू करू. पण चीज ही नेहमी 9 व्या मात्रेस सुरू होते आणि तो नवखा असल्याने तो पहिल्या मात्रेपासून सुरू करत होता. शेवटी मीच म्हणाले तू सुरू कर मी ताल पकडते आणि तो ताळमेळ साधता-साधता आमच्या नाकी नऊ आले. तेंव्हा कुठे माहीत होत तबला साथ करणे हे पण पुढच्या परीक्षांत शिकवतात म्हणून! नंतर प्रत्येक वेळेस जेंव्हा तबल्या सोबत गायले तेंव्हा गाणं म्हणण्याची ही पहिली वेळ आठवून खुदकन हसू यायचे! .

एके दिवशी बाई म्हणाल्या आता तुमची पहिल्या परीक्षेची तयारी झाली आहे. परीक्षेत आम्हाला आमचा आवडता राग म्हणायचा होता. काही जणांनी काफी राग काही जणांनी सारंग राग निवडला. मी मात्र भीमपलास राग निवडला होता! का कोण जाने कारण काही आता आठवत नाही. बहुतेक मला त्याच नाव आवडलं असेल 🙂 . त्याची तयारी बाईनी करून घेतली होती. बाईंचा मोठा भाऊ कानोले गुरुजींकडे परीक्षेचे केंद्र होते. सकाळी सगळेजण मिळून बाईंकडे जमलो आणि तिथून परीक्षा केंद्रावर. परीक्षा केंद्र म्हणजे त्यांचे घरच होते. आम्हाला एका खोलीत बसवण्यात आले आणि आम्ही आमची वेळ कधी येते याची वाट पाहत बसलो. इतका वेळ नुसता विचार करत होतो काय विचारतात काय नाही म्हणून पण ऐन परीक्षेत आम्हाला पूर्ण ग्रुपला मिळून एकच राग म्हणायला लावला कारण खूप उशीर होत होता! परीक्षा संपली की सगळे मिळून पहिल्यांदा आईस्क्रीम खायला गेलो कारण परीक्षेपर्यंत आम्हाला गळे सांभाळायला सांगीतले होते!  नंतर परीक्षेनंतर आईस्क्रीम हि प्रथाच पडून गेली आमच्या क्लासची 🙂 बघता- बघता ३ परीक्षा उत्तम मार्कांनी पास झाले. मग गणपती, शारदा उत्सवात गाण्याच्या स्पर्धा मध्ये गाणे म्हणाले.

नांदेडहून बाबांची बदली उदगीरला झाली आणि माझे गाणे शिकणे जवळपास बंदच झाले. तो पर्यंत मा‍झ्या ३ परीक्षा झाल्या होत्या. पुढे चालू ठेवण्याची इच्छा पण होती. पण उदगीरला एकच सर गाणे शिकवायचे. त्यांचा क्लास संध्याकाळी असल्याने मी सकाळी शाळेसाठी घरातून निघाल कि परत येण्यास मला रात्रीचे ८-९ वाजायला लागले. आणि क्लास खूप लांब असल्याने कुणाला तरी मला घरी घेऊन जाणे आवश्यक झाले. मला मा‍झ्या बाईंच्या क्लासची सवय असल्याने पुरुषी आवाजाची पट्टी काही मला कळेना. बाईंकडे आम्हाला सगळ्यांना एक -एक पेटी निदान थोडावेळ वाजवण्यास मिळायची. इथे सर पेटी वाजवायचे आणि आम्ही सगळे मिळून गाणे म्हणायचो. मला ते काही आवडेना झाले. आणि या सगळ्या कारणामुळे माझे गाणे मात्र मागे पडले. अधून मधून शाळेतल्या ग्रुप मध्ये गाणे म्हणायचे पण रियाज मात्र बंद पडला! उदगीरहून नांदेडला परत आल्यावर पुन्हा क्लासला जायला लागले तर दहावीचे वर्ष आले. अर्धा -एक घंटा वेळ कुठे वाया घालायचा म्हणून दहावीला पूर्णपणे गाणे शिकणे बंद झाले.

गाणं शिकणं बंद केल्याच दुख मला झालं ते इंजीनियरिंगला गेल्यावर! गाणं जर येत असेल तर gathering मध्ये भलता भाव मिळायचा.  माझा बुजरा स्वभाव (आणि नवीन गोष्टी करण्या आधीचा उपजत inertia) पण माझे गाणे थांबण्यास कारणीभूत होता असे मला वाटते. कुणी गाणे म्हण दहादा म्हणल्यावर कुठे मी एकदा गाणे म्हणायचे. आपल्याला काही तरी चांगलं येत याचा विश्वास इतर क्षेत्रात पण पुढे जाण्यास मदत करतो. चार वर्षांपैकी एकदाच  मी गाण्याच्या ऑडीषनला गेले होते थर्ड यियर ला असताना. पहिल्या राऊंडला “सांज ये गोकुळी” म्हणल, पास झाले पण नंतरच्या राऊंडला गाळली गेले. सारेगामा किंवा Indian Idol चालू असताना खूप गाणं म्हणावं वाटायचे.

मला स्वत:ला असं वाटत कि मला काही फारशी गती नसावी गाण्यात. काही गाणी म्हणता यायची (होटोसे छुलो तुम (बाबांची नेहमीची शिफारस 🙂 ), जीवनसे भरी तेरी आंखे, रजनीगंधा फूल तुम्हारे, जरा लक्ष दिले तर कळेल की मला शांत गाणी म्हणायला आवडायची). आवाज तसा चांगला होता पण मधल्या पट्टीचा होता, उंच चढायचा नाही, एकदा दोनदा मी मा‍झ्या बाईंनी ” ती मुग्धा आहे ना, ती पहिल्यांदा क्लासला आली तेंव्हा मला वाटले नव्हते कि तिला गाणे येईल आता बघ कशी म्हणते  ” असे कुणाला तरी  गाणे चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन पर सांगितल्याचे ऐकले होते. मा‍झ्या क्लास मधील मैत्रिणी सगळ्या नवीन हिंदी गाण्याचे नोटेशन स्वत: बसवायच्या आणि वाजवायच्या. मला ते कधीच जमले नाही. माझा स्वभाव मुळातच जेवढं लिहून दिले आहे तेवढं वाजवायचे, गायचं असा होता. स्वत: रागातल्या ताना बनवणे, ख्याल म्हणताना आलाप म्हणणे हे काही मला जमायचे नाही. पण वहीत जेवढं लिहून दिले आहे ते मात्र तोंडपाठ!  खरं तर ही वरवरची कारण झाली. मी गाणं शिकत असताना मला मा‍झ्या काकांनी त्यांच्या कडची पेटी आणून दिली होती. ती पेटी कित्येक दिवस घरी असली तरी मी क्वचितच वाजवली. माझी मामी संगीतात अलंकार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी अनेकदा मुंबईला जात असे पण कधीच तिच्या समोर बसून गाणं शिकले नाही. बहुदा गाणे हे माझे माध्यम नसावेच. आता जाणवते कि लिहताना जो सूर मला गवसतो तो गाणे शिकताना/म्हणताना कधीच गवसला नाही.

आता मी कधी-कधी काम करताना गुणगुणते, पण मी म्हणत असलेले गाणे नीरज लागलीच laptop वर लावतो ! तेवढीच मा‍झ्या गाण्याची पावती मिळाल्यासारखे मला वाटते!

मा‍झ्या गाण्याची छोटीशी झलक! https://www.youtube.com/watch?v=avlA0BISDQw

 

 

 

Advertisements

One thought on “…अंतर्यामी सूर गवसला!

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: