हळदी साठी आसुसलेले…

काही दिवसापूर्वी चैत्र ही शोर्ट फिल्म पाहण्याचा योग आला. ही शोर्ट फिल्म जी. ए. कुलकर्णींच्या कथेवर आधारित आहे हे माहीत होते आणि त्यामुळे ती बघण्याची खूप इच्छा होती. पण अजून युटयूब वर ती आलेली नव्हती. संध्याकाळी छान काही तरी बघावं असं मनात आलं आणि सहज ही फिल्म शोधली. जेमतेम २० मिनिटाची ही फिल्म आहे पण या २० मिनिटाच्या फिल्मने मा‍झ्या आयुष्यातील २० वर्षापूर्वीच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या.  चैत्राच्या सुरुवाती पासून ते अक्षय्यतृतीया पर्यंत रोज कुणा न कुणा कडे हळदी कुंकू असायचे. सकाळी -सकाळी माळकर्यांचा गोविंदा किंवा संभाजी आज कुणाकडे हळदी कुंकू आहे याची यादी घेऊन यायचा.  एका दिवसात निदान २-३ ठिकाणीतरी हळदी कूंकू असायचे. हे दिवस त्यांच्या कमाईचे दिवस असायचे. लहानपणी मला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जायला खूप आवडायचे मग ते संक्रांतीचे असो की चैत्र गौरीचे. संक्रांतीच्या काळात वाण म्हणून छोटी- छोटी खेळणी, पेन, पेन्सिली किंवा वाणा सोबत दिले जाणारे तिळगूळ याच्या वर अर्थातच आमचा डोळा असायचा. काही घरी जसे की बोडखे काकू किंवा शिंदे काकू किंवा अगदी देशमुख काकूंकडे आम्हाला अख्खा तिळगूळाचा लाडू मिळायचा.

haldi kunkuचैत्राच्या हळदी कुंकवाची वेगळीच मजा…प्रत्येक घरात चैत्र गौरीची सुंदर आरास केलेली असायची. दारात रांगोळी असायची. घरातली सवाष्ण स्त्री सुंदर तयार झालेली असायची. आलेल्या प्रत्येकाशी आवर्जून दोन मिनिट तरी बोलून त्यांना हळदी कुंकू लावून पान सुपारी  देऊन ओटी भरायची. छान सुवासिक अत्तर लावणार. चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाला सवाष्णींना हरभर्‍याची भिजवलेली डाळ आणि मुरमुरे देऊन ओटी भरण्याची आपल्याकडे पद्धत आहे. प्रत्येकाच्या घरी ही डाळ वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. काही जण या डाळीत कैरी आणि हिरवी मिरची टाकून वाटली डाळ बनवतात. घरचे कितीही श्रीमंत असले तरीही त्या दोन चमचे मिळणाऱ्या डाळीत सगळ्या बच्चेकंपनीचा जीव अडकायचा. काही जण तशीच डाळ किंवा भिजवलेले चणे देतात.

IMG_1690दुसऱ्या दिवशी आई या डाळीची जाडसर भरड काढून घ्यायची आणि त्याला कैरी, बारीक चिरलेला कांदा, ओलं नारळ  आणि कोथिंबीर घालून परतून डाळ बनवायची. जसे दाळीचे प्रकार वेगळे तसेच कैरीच्या पन्ह्याचे पण प्रकार वेगळे. काही ठिकाणी साखर घालून तर काही ठिकाणी गुळ घालून पन्हे! खूपच सुग्रण गृहिणी असेल तर चवीला विलायची 🙂 हे सगळं बघायला मला खूप आवडायचं. कॉलनीतल्या काही घरात बरेचदा स्पर्धा चालायची की कोणाची सजावट सगळ्यात चांगली आहे. ज्यांच्या घरात ‘कलाकार ‘ मुली होत्या, जसे की आमचे घर ,पांडे काकू, बोडखे काकू तिथे दरवर्षी नवा प्रयोग केलेला असायचा.

आई घरातली सगळी कामं संपवून खूप उशिरा निघायची पण प्रत्येक जण तिची आवर्जून वाट पाहत असायचे. कॉलनीतील लोकांना किंवा कॉलनीच्या बाहेरच्या मैत्रिणींना भेटायची ही तिची एकमेव संधी असायची. नाही तर तिला घर बाहेर जायचे म्हणजे जरा कठीणच असायचे. आमचं कुटुंब मोठं होतं मग महिनोन्महिने तिला घराबाहेर पडता येत नसे. तिला आमच्या कॉलनीत खूप मान होता आणि मला त्यामुळे तिच्या बरोबर फिरायला खूप आवडायचे.

आमच्या घरचे हळदी कुंकू म्हणजे एक प्रकारचा सोहळाच असायचा. आदल्या दिवशी आई आरासेसाठी पाच लाडू, चकली, करंजी असे पाच पक्वान्न बनवायची. सकाळी फुलांचा वेण्या घरी येऊन पडायच्या. नाक्यावरच्या पानपट्टी वाल्याला पानाची ओर्डर दिलेली असायची. हरभर्‍याची डाळ आदल्या दिवशीच भिजवून ठेवलेली असायची. दुसऱ्या दिवशी ती उपसून मस्त भांड्यात भरून ठेवलेली असायची. कैऱ्या उकडून थंड करण्यास ठेवलेल्या असायच्या. क्षमा माई मुख्य कार्यक्रमात जास्त सहभाग घ्यायची नाही पण बाहेरची खोली टापटीप करून ठेवणे, आरास करणे, रांगोळी काढणे ही महत्वाची कामे तिची कामं असत. मी आपली लिंबू टिंबू! माझी जवाबदारी म्हणजे सगळ्यांना जाऊन हळदी कुंकवाचे आमंत्रण देणे. सकाळी-सकाळी लवकर निघाले की उन्ह चढायच्या आत मी घरी परत येत असे. हळदी कुंकू आवडण्यामागे आणखीन एक कारण म्हणजे मला नटायला फार आवडायचे. मला साडी घालायला खूप आवडे पण ती घालता मात्र यायची नाही. मग आई तयार होत असताना मग तिच्या मागे पुढे करण सुरू ह्वायचं. तिला आधीच घरचे काम आटपून तीचं आवरायचे पडलेले असायचे आणि माझी मध्ये-मध्ये लुडबुड चालू असायची.

साधारण पाच-साडे पाच पासून एक -एक जण येण्यास सुरुवात होत असे. माझी शाळा कॉलनीच्या जवळ असल्याने मा‍झ्या शाळेतील प्रत्येक शिक्षकास आमच्या घरी आमंत्रण असे. हा ग्रुप सगळ्यात प्रथम आमच्या घरी येऊन दाखल होत असे. आई आलेल्यांना गजरा, पान, ओटी देत असे आणि मी पन्हे आणि डाळ. ओटी भरून झाली की आई मनोभावे सगळ्यांच्या पाया पडायची. काही वर्षांपूर्वी आईच्या पाठीला मार लागल्याने डॉक्टरांनी तिला जास्त वाकण्यास मनाई केली होती पण तरीही ती सगळ्यांच्या पाया पडायची. बाबा आणि आजोबा मात्र त्यादिवशी संध्याकाळी गुपचूप त्यांच्या-त्यांच्या खोलीत जाऊन बसायचे.

हळू -हळू हळदी कुंकवाचे स्वरूप बदलत गेले. ४-५ जणीत मिळून एका ठिकाणी हळदी कुंकू केले जाऊ लागले. पण मग अशा वेळेस आपल्या ओळखीचे कोण आले कोण नाही याचा काहीच पत्ता लागत नाही. कधी काही लोक कोणाच्या ओळखीचे आहेत ते पण कळत नाही. पुर्वी महिनाभर चालणारे हळदी कुंकू, कॉलनीच्या वरच्या भागातली घरे एका दिवशी आणि कॉलनीच्या खालच्या भागातली घरे एका दिवशी असे दोन दिवसात सगळे संपून जाऊ लागले. घरच्या मुली लग्न किंवा शिक्षणासाठी इकडे तिकडे पांगल्याने आई आणि कॉलोनीतील काकुना एकमेकीच्या मदतीने हळदी कुंकू करणे सोयीचे वाटायला लागले. दरवर्षी येणारा एक सण सोपस्कार म्हणून पार पडू लागला.

मी औरंगाबादला कॉलेज साठी शिफ्ट झाले आणि हळदी कुन्काच्या कार्यक्रमा पासून मी हळू हळू दूर गेले. मनातून मात्र मला या हळदी कुंकवाचे खूप आकर्षण वाटायचे. आपले लग्न झाल्यावर आपणही असेच हळदी कुंकू करू असे वाटायचे. राणी ताई, क्षमामाई या अभ्यासू टाईप च्या असल्याने माझ्या अम्मुला हे सगळे आवडेल असे आईला वाटायचे. माझे लग्न झाले जुलै महिन्यात आणि मी सप्टेंबरला अमेरिकेत दाखल झाले. नावाला एक मंगळागौर झाली माझी आणि ती हि घाईघाईने! त्यानंतर इथे तर काय विचारायलाच नको. नाही म्हणायला मराठी मंडळात असे कार्यक्रम होतात. पण माहित नाही त्यांना आता कसे स्वरूप आले असेल.

आई सोबत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेले की आई नंतर मला सगळ्या काकू ‘कुंकू लावलेलं आवडतं का गं? असं विचारणार आणि हो म्हणताच एका बोटाने रेखीव छोटे कुंकू लावणार आणि मिश्कील पणे हसून हमखास म्हणणार ‘हळद लावायला अजून वेळ आहे’…त्या हळदीच्या बोटासाठी अजूनही माझे मन झुरते आहे!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: