दान

माझे केस नेहमीच लांब होते. मधल्या काळाचा अपवाद सोडला तर. लांब आणि सुतासारखे सरळ. थोडेसे भुरे, काही काळे आता बरेचसे पांढरे आणि लालसर छटा…मेंदीचा परिणाम! माझ्या आईचे केस कुरळे आहेत. मला नेहमीच तिचा हेवा वाटला आहे. सरळ नाक, कुरळे केस आणि तुकतुकीत त्वचा. लहानपणी आम्ही बहिणी तिच्याशी भांडायचो…तू ‘यातलं ‘ आम्हाला काहीच वाटलं नाहीस म्हणून. असो. तो एका स्वतंत्र निबंधाचा विषय आहे… 🙂 आम्हा सगळ्यांचे केस सरळ आणि रेशमी…बाबांकडून आलेले.

314487_10150817944815167_777263917_nमाझा अतिशय जीव आहे माझ्या केसांवर. लहानपणी किंवा ८-९ वी नंतर मला लांब केस आवडायला लागले. नाहीतरी आपल्याकडे सिनेमा मध्ये, जाहिरातीतून किंवा टीव्ही वरच्या मालिकेतून लांब केसांच्या नायिका दिसायच्या. मुलांचे केस लहान, मुलींचे केस लांब…तसं नसेल तर त्यावर लागलीच टिप्पणी होणार. मी दोन वेण्या घालून किंवा कधी एकच वेणी घालून शाळेत जायचे. कुरळ्या केसांचे मला फार आकर्षण आहे. लहानपणी कधी -कधी केस धुतल्यावर अनेक छोट्या- छोट्या वेण्या घालून केस कुरळे केल्याचे आठवतात. ज्यांचे कुरळे केस होते त्या मैत्रिणी म्हणणार तुझे केस किती छान, आवरायला सोपे आणि मी म्हणणार तुमचे केस किती छान! पाठीवर रुळणारे केस आणखीन लांब असावेत असे मला सतत वाटायचे…मग लांब केस झालेल्या एखाद्या मैत्रिणीचे ‘अग कोरफड आणि मेथी दाणे एकत्र भिजव किंवा नारळात मेथ्या भरून त्यांना मोड येऊ दे आणि त्याचे तेल बनव आणि लाव छान केस वाढतात वगैरे वगैरे…किंवा हे हे तेल लाव’ असे सल्ले ऐकायला मिळायचे! सगळ्यांना एकच उपाय लागू होत नाही…पण तेवढ्या साठी कॉलनीत घरोघरी कोरफड शोधलेली आठवते! आणि दर दोन दिवसाला केसांची लांबी मोजलेली आठवते. केस कापायचे म्हणले कि नको वाटायचे.

आई बाबांनी लहान पणापासून आमच्यावर कधीच कोणतीच बंधने लादली नाहीत. असं करू नका, हे घालू नका वगैरे. I always took this freedom for granted.  म्हणूनच बहुदा मी बंडखोर नाहीये किंवा मला तशी गरज पडली नाही. केसांच्या बाबतीतही तसेच लांब असुदे कि छोटे माझीच मर्जी. केसांचा आणि बंडखोरीचा फार जवळचा संबंध आहे हे मला फार उशिरा कळले. ‘रोमन हॉलिडे ‘ या चित्रपटातली नायिका राजवाड्यातून बाहेर पडताच पहिल्यांदा तिचे केस कापायला जाते. न्हावी तिला विचारतो किती कापु? ती त्याला कानापर्यंत केस कापायला सांगताच त्याच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त आश्चर्य येते, त्याचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नाही आणि तो तिला विचारतो खरेच इतके कापु? ती ठामपणे हो म्हणते. जणू ते लांब केस तिला बेड्या वाटत असतात. साधा प्रसंग पण किती बोलका! बरेचदा मुलींना डोक्यावरून ओढणी घेणे किंवा डोक्याला रुमाल बांधण्याची सक्ती केली जाते. सुंदर केसांकडे परपुरुष आकर्षित होऊ नयेत म्हणून. माझ्या कित्येक मैत्रिणी अमेरिकेत येताच सर्वप्रथम तो रुमाल झिडकारून देतात. राजकारण्यांच्या अरेरावीचा निषेध व्यक्त करण्यासाठी कित्येक जणींनी आपले केस पूर्णपणे कापलेले पहिले आहेत मी.

अशीच माझी एक मैत्रीण… परंपरा जपणारी! अमेरिकेत येऊन तीन चार वर्ष झाले तरीही रोज lab मध्ये येताना केस झाकण्यासाठी रुमाल बांधून यायची. मी तिला एकदा दोनदा विचारले होते… मला तुझे केस पाहायचे आहेत. तुला बाकीच्या मुलींकडे पाहून केसांची style करावीशी वाटत नाही का? तुझे केस सगळीकडे मिरवावे वाटत नाहीत का? एकदा lab मध्ये कोणी नसतांना तिने मला तिचे केस दाखवले होते आणि त्याच क्षणी एक मुलगा आत आल्यावर तिची झालेली घालमेल मला अजून आठवते. जणू काही आपण मोठे पाप केले आहे असे तिच्या चेहऱ्यावर भाव होते. पुढे ती graduate झाली आणि जॉब साठी सर्च करतांना मात्र तिला लक्षात आले कि उगीच या कारणाने आपल्यावर अन्याय होऊ नये. पण मनाची तयारी आणि कुटुंबियांची परवानगी घ्यायला तिला खूप त्रास झाला. दोनच वर्षापूर्वी एक दिवस ती रुमाल न बांधता lab मध्ये आली. काहीही न बोलता, विचारता मी तिच्या गळ्यात पडले. तिच्या देहबोलीतून वेगळाच आत्मविश्वास जाणवत होता. स्वातंत्र्याचा नवा अर्थ मला मिळाला.

25681_10150161270615167_8253192_n१० वीला असतांना वेगळेच खूळ मनात आले. बहूतेक हे वर्षच असे असते…आपल्याकडे विद्यार्थी आणि त्यांचे पालक जरा वेड लागल्यासारखेच वागतात… हे खाऊ नको…ते करू नको अभ्यासाला वेळ पुरणार नाही…आई बाबा असे बिलकुल नाहीत …पण बाकीच्यांचे ऐकून मलाही वाटायला लागले आपला अभ्यासातला वेळ जातो लांब केसामुळे! मग एके दिवशी खांद्यापर्यंत केस कापले…अभ्यास किती केला माझे मलाच नाही तर मार्क मिळाल्यावर सगळ्यांनाच कळले …पण वेळ मात्र वाचवला केस कापून! नंतर अमेरिकेला येताना केस कापले होते…. पैसे वाचवायला…इथे केस कापायला खूप पैसे लागतात असे मैत्रीण म्हणाली होती.!

नांदेड हे आंध्रप्रदेशच्या अगदीच जवळ आहे. आम्ही लहानपणी नेहमी बासरला जायचो. तेथे सरस्वतीचे मंदिर आहे. सकाळी ५ ची ट्रेन पकडली तर आठ- साडे आठ पर्यंत व्यवस्थित दर्शन करता यायचे. तेथे मी पहिल्यांदा पूर्णपणे केस कापलेली स्त्री पहिली होती. मला खूप आश्चर्य वाटले होते. तेंव्हा आईने सांगितले कि आपल्या कडे दक्षिणेत अनेक मंदिरात केस दान करतात. पुरुष आणि स्त्रियाही! विशेषतः दक्षिणेत मुलींचे केस लांब आणि दाट असतात. तेंव्हा मला नेहमी प्रश्न पडायचा. कसं काय जमत त्यांना? त्यांना मोह होत नाही केसांचा, सौंदर्याचा? पण आता जरा विचार केला तर असे लक्षात येईल कि खरे पहिले तर का असावा मोह ? हे तर सगळ्यात सोपं दान झालं. वाढतातच न कापले तरी…खरतरं अधिक जोमाने वाढतात.

मागच्या एक वर्षापासून केस कापायचे आहेत…कंटाळा आला आहे लांब केसांचा…मागचे काही फोटो पाहून मैत्रिणी म्हणत होत्या कि तुला लहान केस चांगले दिसतात. तुझी उंच मान जी लांब केसात झाकली जाते ती उठून दिसते…मनात आलं कि कापुया केसं…मस्त बॉब करावा किंवा लेयर्स कराव्यात…आवरायला पण सोपे. पण खूपच केस कापावे लागतील आणि ‘कापलेले’ केस वाया जातील…त्या कापलेल्या केसांचा पण मला मोह होत होता… असे यापुर्वी कधीच वाटले नाही, एकदा दोनदा अगदी १०-१२ इंच केस काहीही न वाईट वाटता कापले होते…मग आता का वाटावे? झाले असे कि मागे काही महिन्यांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने तिचे केस कमरे पर्यंत लांब वाढवले होते आणि १० इंच केस एका संस्थेला दान केले होते. मला तिचे खूप कौतुक वाटले होते. इथे अशा अनेक संस्था आहेत ज्या cancer ने पिडीत लहान मुलांसाठी विग बनवतात. असे विग बनवण्यास निदान १० इंच लांबीचे केस लागतात…खोट्या केसांचे विग बनवण्याऐवजी खरे केस,…beautiful lengths, locks ऑफ love, यापैकी कोणतीच संस्था मला माहित न्हवती. केस गळणे हा केमोथेरपीचा पहीला साइड इफेक्ट! आधीच cancer झाला आहे म्हणालं कि माणसाच अर्ध अवसान जात, त्यात विद्रुपता आणखीन खंगून टाकते. माझे केस जरा गळायला लागले कि मला प्रचंड टेंशन येतं. मोठ्या बायकांना जर केस गळण्याचे वाईट वाटत असेल तर तेथे लहान मुलांचे काय होत असेल?

देवाला केस दान करून काय मिळत माहित नाही आणि भारतातल्या अनेक देवळातले केस इथे विग (पण हे केस विग बनवणाऱ्या दुकानांना विकले जातात cancer ग्रस्तांना मदत करणाऱ्या संस्थांना नाही!) बनवण्यासाठी विकले जातात असे ऐकले…आता यातले काय खरे आणि काय खोटे ते त्या ‘देवालाच(?!)’ माहित…पण एखाद्या चिमुरडी साठी जर दान करायचे असतील तर मला नक्की आवडेल. दुर्देवाने आमच्या घरात cancer ने बरेच जण आजारी पडले असल्याने या विषयात कोणतीही आवश्यक मदत करण्यास मला आनंद होतो. त्यातल्या त्यात लहान  मुलांच्या cancer रिसर्च  साठी जोपर्यंत पैशाने मदत करण्याची ऐपत येत नाही तोपर्यंत अशी मदत…किती सुंदर विचार…केस वाढवायचे…मिरवायचे आणि दान करायचे (ते पण अत्यंत सोपे आहे! तुमच्या शहरात अशी अनेक सलोन असतात जे या संस्थांशी संलग्न आहेत. तिथे जायचे आणि केस कापायचे बाकी सगळं ते करतात…जसे कि या संस्थांना ते केस नियमाप्रमाणे पाठवणे. ) आणि पुन्हा छान हेयर style साठी complement मिळवायच्या… ते ‘वाया’ जाणारे केस निदान एखाद्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर हसू तरी आणतील…यावेळेस केस कापण्यामागच खर कारण मला मला सुंदर बनायचं आहे आतून आणि बाहेरून!

आपल्या कडे अशी म्हण आहे कि दान असे करावे कि उजव्या हाताचे डाव्या हाताला पण कळू नये…पण या लेखाच्या मार्गाने हि माहिती अनेकांच्यापर्यंत पोहोचावी एवढीच अपेक्षा!

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: