लग्नगाठ!

Image
पोहे

लहानपणीची गोष्ट आहे…तेंव्हा आम्ही उदगीरला होतो. दुपारपासून आई आणि आत्याची लगबग चालू होती. घर टापटीप करून ठेवणे चालले होते. माझ्या चुलत आत्याचा ‘दाखवण्याचा ‘ कार्यक्रम होता. मुलगा उदगीरचा असल्याने आमच्याच घरी कार्यक्रम करावा असे ठरले. आत्याने सुंदर साडी नेसली होती आणि ती मस्त पैकी तयार होत होती. मी तिच्या तयारीकडे कौतुकाने पाहत होते. आई स्वैपाक घरात काही तरी खुड-खुड करत होती. मी जाऊन पहिले तर तिने पोहे बनविले होते. जाड पोहे भिजवून त्याला हिरवी मिरची, कांदा, शेंगदाणे, कढीपत्ता, हळद आणि मीठ टाकून फोडणी दिले. वाफ आल्यावर त्यावर ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली आणि लिंबाच्या फोडी करून ठेवल्या. मुलगा आणि त्याचे आई वडील आले. त्यांच्या आईबाबा आणि आत्याशी गप्पा झाल्या मग आत्या कांदेपोहे घेऊन गेली.

माझ्यासाठी लग्नाचा आणि कांदे पोह्यांचा संबंध कायमचा जोडला गेला तो तेंव्हा पासून! त्या आधी सकाळच्या नाश्त्यासाठीचा एक प्रकार म्हणून पोहे मला माहित होते. लग्न ठरविताना कांदे पोहे का करतात हे काही मला अजूनतरी कळले नाहीये! आणि हे पोहे ती मुलगी करतेच असे नाही. कधी आई, कधी घरची कोणीतरी सुग्रण! बरे मग पोहेच जर करायचे तर मग दडपे पोहे का नको? मी तर बाई दडपे पोहे केले असते! असे नाही कि आमच्या कडे दडपे पोहे जास्त बनवले जायचे…पण एकदा मी माझ्या दीक्षित काकूंकडे गेलेली असतांना त्यांच्या आईने बनवलेले दडपे पोहे माझ्या मनात अगदी कायमची जागा करून बसले होते. पोहे पाण्यात भिजवण्याच्या ऐवजी ताक किंवा नारळाचा चव या मध्ये भिजवायचे.  आता या पोह्यात कांदा (ऐच्छिक ), दालवे, नारळाचा खीस, मीठ चवीला, हिरवी मिरची टाकायची आणि फोडणी वरून टाकायची. हा थोडा कोकणातला प्रकार झाला आणि त्याला लागणारे ओले नारळ नेहमी घरी असण्याची शक्यता नाही म्हणून मग त्यांचा पत्ता कट झाला असावा 🙂

दडपे पोहे
दडपे पोहे

एक कारण असे असू शकते कि पोहे ‘नेमके’ भिजवणे हि एक हातोटी असते. जमले तर मोकळे छान पोहे आणि फसले तर गच्च गोळे! बरेचदा ‘जाणकार’ हाताने हे पोहे केलेले असतात. 🙂 गम्मत म्हणजे आमच्या घरात कुणाच्याच लग्नाच्या वेळी असे काहीच झाले नाही.  अगदी माझ्या आईच्या लग्नाच्या वेळेसही!  🙂  माझी आई बीए  झाली तेंव्हा पासूनच तिच्या लग्नासाठी माझे आजोबा विचार करत होते. त्या काळी मुलीला लग्नासाठी दाखवायचे म्हणजे फारच किचकट प्रकार होता. मुलाकडचे सगळे नातेवाईक येणार, मग मुलीची परीक्षा वगैरे वगैरे ! आईच्या बऱ्याच मैत्रिणींचा या विषयीचा अनुभव फारसा चांगला न्हवता. त्या सगळ्या प्रकारांमुळे आईला वाटायचे कि आपल्यावर कधी अशी चहा पोहे घेऊन जाण्याची वेळ येऊ नये! देवाने तिचे ऐकले देखील 🙂  ओह, आमच्या आईचे देवाकडचे account त्याच काळी सुरु झाले होते तर!

आई बाबा
आई बाबा

आई आणि बाबांच्या लग्नाची गोष्ट एखाद्या मराठी (का हिंदी पण!) चित्रपटाला शोभेल अशी आहे. आईचे आता लग्नाचे वय झाले आहे असे आजोबांना वाटायला लागले होते. त्यांनी आईचा मामेभाऊ, म्हणजे आमचा गम्पा मामा याच्या कानावर हि गोष्ट घातली. तो म्हणाला पाठवून द्या माझ्या कडे नांदेडला काही दिवसासाठी! झाले माझी आई नांदेडला येऊन दाखल झाली. आईला यातलं काहीच माहित न्हवत. ती मस्त सुट्टी एनजोय करण्याच्या मूडमध्ये तेथे आली होती. आई आणि मामीची एकदम गट्टी! मामी नौकरी करायची. मग शनिवार -रविवार ते बाहेर फिरायला जात. आई त्यांना नवीन नवीन पदार्थ बनवून खाऊ घालायची.

माझे बाबा गम्पा मामांचे मित्र होते. एका दुपारी बाबा सहज मामांकडे आले. आई स्वैपाकघरात काही तरी करत होती. दार वाजले म्हणून कोण आलंय हे बघण्यासाठी घाईघाईने केस आणि चेहरा आवरून ती दार उघडायला गेली. ती होती माझ्या आई बाबांची पहिली भेट! केस आवरण्याच्या नादात आईने खरकटे हात केसाला लावले होते. पण तशीही ती छानच दिसली असणार 🙂 लांब कुरुळे केस, सरळ नाक आणि गव्हाळ रंग …माझी आई लाखात उठून दिसेल अशीच आहे.  बाबा आत आले, मामा आणि त्यांच्या गप्पा झाल्या आईने काहीतरी खाण्यास बनवले होते. मामाने पण लागलीच आईची तारीफ केली आणि सांगितले हि आमची पुष्पा खूप छान स्वैपाक करते… वगैरे वगैरे… 🙂 बाबांना पण खाण्याची प्रचंड आवड! म्हणतात ना की पुरुषांच्या हृदयाचा रस्ता पोटातून जातो…अगदी खरे आहे हे! मग काय त्यानंतर दरच रविवारी बाबा ‘गप्पांसाठी’ मामाकडे आणि आई त्यांना एक एक नमुना करून खाऊ घालत होती!  बाबांचा त्यावेळेसचा रुबाब काही वेगळाच होता. देखणा चेहरा, अतिशय नम्र स्वभाव, बँकेतली कायमची नौकरी आणि घरचे चांगले. मग काय मामानेच रीतसर बोलणी केली बाबांशी आणि माझी आई पुष्पा कऱ्हाडे ची सौ पुष्पा पाडळकर झाली!

माझ्या घरी आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ असे चार भावंड आहोत. आमच्या विषयी आईला वाटे आपल्याला जसे दाखवावे लागले नाही तसे माझ्या मुलीना देखील दाखवण्याची वेळ येऊ नये.  झालेही तसेच! आता काळ बदलला आहे तसेच कांदे पोह्यांचे आणि ‘दाखवण्याच्या’ कार्यक्रमाचेही स्वरूपही!  पारंपारिक पोह्यात गाजर, मटार, बटाटे घातले जात आहेत. मी तर एकदा गाजर, कांदा, कद्दू खिसून त्याच्या पाण्यात पोहे भिजवले होते. पोह्यांची पौष्टिकता वाढवण्यासाठी! लग्न ठरवणे हे पण खूप वेगळे झाले आहे…आता नातेवाईकांच्या ठिकाणी matrimony sites आल्या, internet chatting आले, मुले मुलीला एकटे भेटून बोलून लग्नाचे ठरवत आहेत. या सगळ्यामुळे आमच्या सगळ्यांच्या लग्नाचे पण कांदे पोहे झालेच नाहीत ! राणी ताई आणि क्षितीजचे  love marriage मग काय हा प्रश्नच येत नाही.  क्षमा माईच्या वेळेसचा अनुभव पण वेगळाच.

माझे जरी arranged marriage असले तरी आमचे काही कांदे पोहे झाले नाहीत!  आमची ‘पावभाजी’ झाली होती 🙂 माझी क्षमा माई माझ्यापेक्षा मोठी असल्याने अजून आपला नंबर यायला बराच वेळ आहे असे मला वाटत होते. पण योग कधी आणि कसा जुळून येईल ते काही सांगता येत नाही. नीरज आणि त्याचे बाबा आमच्या घरी भेटावयास आले तेंव्हा मी मुंबईत होते. हे सगळे इतके अचानक ठरले कि आईला काही बनवायला वेळ पण मिळाला नाही. आमच्या कडे मोड आलेली मटकी नेहमीच असते. आईने त्यांना चिवडा, मोड आलेली मटकी आणि शेव यांची भेळ दिली होती. (नंतर काही वर्षाने नीरजने मला सांगितले कि मटकीची उसळ हि त्याची सगळ्यात आवडती आणि पौष्टीक काही तरी खायला दिला म्हणून अर्धी लढाई तिथेच जिंकली होती मी! ते सुद्धा त्याला न भेटता!) नंतर आमची मुंबईत झालेली भेट तर तुम्हाला माहितीच आहे! ( https://mugdhapadalkar.wordpress.com/2013/09/04/how-i-met-your-father/ आणि https://mugdhapadalkar.wordpress.com/2013/09/06/how-i-met-your-father-episode-2/)

…शेवटी ‘कांदे पोहे’ काय किंवा प्रेम विवाह केला काय….लग्न गाठी तर स्वर्गातच बांधल्या जातात ना?

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: