कुछ मीठा हो जाये!

लहानपणी मला ‘धारा’ तेलाच्या टीव्ही वरच्या जाहिराती खूप आवडायच्या. त्यापैकी एका जाहिरातीत ऑफिसमध्ये जेवणाची सुट्टी झालेली आहे. एक माणूस डब्बा समोर घेऊन बसलेला असतो आणि आजूबाजूचे त्याच्या डब्ब्या कडे लक्ष देऊन पाहत असतात. हा डब्बा पण ४ -५ कप्प्यांचा टिफिनचा डब्बा असतो आणि त्यात निरनिराळे पदार्थ असतात. या जाहिरातीत एकच वाक्य आहे आणि ते पण शेवटी. हे वाक्य मला खूप आवडायचं ‘हम काम क्यू करते है ? खाने के लिये’! वाह तो डब्बा आणि त्यातले पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटायचं.

अशीच आणखी एक जाहिरात होती ती एका लहान मुलाची. तुम्हाला नक्कीच लक्षात असणार! मुलगा कशामुळे तरी त्याच्या आई -बाबांवर चिडला आहे आणि घरातून पळून जात आहे. असे असले तरी घरचा रामुकाका दिसल्यावर लागलीच त्याची खळी खुलते. तो त्याला सांगतो माझ्यावर कुणीच प्रेम करत नाही मी घर सोडून चाललो आहे. मग रामुकाका त्याला म्हणतो ‘अरे पण घरी तर आईने जिलबी बनवली आहे.’ आता जिलबी म्हणाल्यावर त्याचे डोळे मस्त चमकतात! तो रामुकाका बरोबर घरी परत येतो…आईने टेबलावर जिलबी ठेवलेली असते आणि हा पठ्या त्याच्यावर ताव मारतो. त्याला चिडवण्यासाठी आई म्हणते अरे तू तर घर सोडून जाणार होतास ना ? तेंव्हा तो म्हणतो ‘जाना तो है…उरलेलं वाक्य मात्र त्याचे बाबा पूर्ण करतात ‘पर बीस पच्चीस साल के बाद ‘! हि जाहिरात मला अनेक कारणासाठी आवडते. तो छोटा मुलगा इतका छान अभिनय करतो आणि या जाहिरातीमधली मस्त केशरी रंगाची पाकात मुरलेली जिलबी! माझे बाबा घरातल्या कोणत्याही खोलीत असले तरी हि जाहिरात लागली कि लागलीच बाहेर यायचे!

माझी जिलबी!
माझी जिलबी!

जिलबी हि भारतीय गोड पदार्थांची अनभिषिक्त राणी आहे असे म्हणल तर काही वावगे ठरणार नाही. बाळाचा जन्म, बढती, किंवा मग लग्न अशा प्रत्येक आनंदाच्या क्षणी तोंड गोड करण्यासाठी जिलबी हि हवीच. मध्यप्रदेश किंवा उत्तर भारतात ठीक-ठिकाणी जिलबी -पोहे हा सकाळचा नाश्ता असतो. एखाद्या पदार्थाचा घाट घालणे हा वाक्यप्रचार कोणत्या पदार्थांवरून आला असेल असा प्रश्न जर कुणी विचारला तर निदान top ५ मध्ये जिलबीचा नंबर नक्कीच लागेल. आदल्या दिवशी मैदा आंबट दह्यात भिजवायचा आणि त्याला मोहन टाकायचे. हे पीठ जास्त घट्ट नको आणि जास्त सैल हि नको. दुसऱ्या दिवशी हे पीठ फेटायचे आणि नारळाच्या करवंटी किंवा केचपच्या बाटलीत टाकायचे. जिलबी करतांना खोल भांडे वापरण्या ऐवजी पसरट भांडे वापरावे. इच्छे प्रमाणे तूप किंवा तेल गरम करावे आणि गरम तेलात पात्राच्या साह्याने गोलाकार जिलबी बनवावी. या जिलबीला सोनेरी रंग येताच ती तेलातून निथळून काढावी आणि साखरेच्या एकतारी पाकात टाकावी. जिलबीचे पीठ जर छान भिजले असेल तर जिलबी मधून पोकळ होते आणि पाकात टाकताच त्यात छान पाक भरतो आणि ती पारदर्शक दिसते. या पाकात तुम्ही मग हवेच तर विलायची पूड टाकू शकता किंवा मग केशर! आता सरळ ती जिलबी हातात घ्या नी तोंडात जाउद्या! अहाहा ! समाधान म्हणजे काय असते हे जर अनुभवायचे असेल तर गरमागरम ताजी जिलबी खाऊन बघा!

जिलबी सारखाच आणखीन एक प्रकार म्हणजे इम्रती. पण या मध्ये मैद्याच्या जोडीने (?) उडदाच्या दाळीचे पीठ असते आणि त्यांचा आकार थोडा वेगळा असतो. उडदाच्या दाळीने इम्रतीला खमंग चव येते. नांदेडला भाग्यनगरला खूप छान इम्रती मिळायची. कितीही वाजता गेले तरी इथे लांब लचक लाईन असणार!

माझी आई अतिशय सुग्रण आहे पण या एका पदार्थाचे नाव काढले कि ती जरा मागे हटायची. गम्मत म्हणजे माझ्या बाबांना नेमकी जिलबी अतिशय आवडते. त्यांच्या वाढदिवसाला त्यांची जिलबी करण्याची इच्छा असायची. आपल्या कडे काही पदार्थांविषयी असा (गैर) समज असतो कि हे पदार्थ विकतचेच चांगले लागतात किंवा घरी बनवताच येत नाहीत. जिलबी हा त्यापैकीच एक. आई पण जरा घाबरायची जिलबी म्हणलं कि! पण घाबरेल ती माझी आई कशी? तिने एकदा मनावर घेतले कि मग काय. काही वर्षापूर्वी आईने जिलबी बनवण्याचे तंत्र शिकून घेतले आणि आता तिला उद्या जरी जिलबी कर म्हणालं तरी काही टेंशन येत नाही. 🙂

ब्रेडची जिलबी :)
ब्रेडची जिलबी 🙂

तसे आम्ही कधी कधी ब्रेडची जिलबी बनवायचो. 🙂 ब्रेडचे चोकोनी काप करायचे आणि सोनेरी रंग येइपर्यंत तळायचे. तेलातून काढताना मात्र तेल नीट निथळून घ्यायचे बरका! नाही तर हा प्रकार खूप तेलकट लागतो. मग ह्या ब्रेडच्या जिलब्या मस्त एकतारी पाकात डुंबत ठेवायच्या कि झाली ब्रेडची जिलबी तयार. मग या पाकात थोडं लिंबू पण पिळू शकता हवे तर. पण हा प्रकार म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे असे झाले. जिलबी म्हणजे वेगळेच रसायन. जर तुम्हाला जिलबी खूप गोड वाटत असेल तर हे करून पहा. एका वाटीत दुध घेऊन त्यात जिलबी बुडवा आणि मग खाऊन बघा आणि नंतर त्या दुधात या जिलबीचा जो गोडवा उतरतो त्याने दुध पण छान लागते. बाबांचा हा एकदम आवडता प्रकार आहे.

फनेल केक
फनेल केक

नुसते भारतात नाही पण निरनिराळ्या देशात पण जिलबी बनवली जाते. भारतावर अनेक देशातल्या राजांनी राज्य केले. या बाहेरून आलेल्या आक्रमणाचा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीवर पण प्रभाव पडला आहे. जिलबी हा खरतरं मुस्लीम राजवटी कडून आलेला पदार्थ आहे. इतर देशातही थोड्याफार फरकाने जिलबी बनवली जाते आणि विशेष म्हणजे त्याचे नाव पण बरेचसे सारखे आहे. जसे जीलाबिया, जलेबी, ज्लाबिया … 🙂 फनेल केक म्हणून एक जिलबीच्या अतिशय जवळ जाणारा प्रकार अमेरिकेत फेमस आहे. फनेल म्हणजे नरसाळे आणि त्यातून पीठ पाडून बनवतात म्हणून फनेल केक. इथे उन्हाळ्यात ज्या जत्रा असतात त्यात फनेल केक हा पदार्थ विकत घेण्यासाठी सगळ्यात मोठी लाईन असते! फनेल केक हाताच्या पंज्याच्या व्यासाचा असतो. जिलबी पाकात घोळवलेली असते तर फनेल केक वर पिठी साखर टाकलेली असते.

मागच्याच आठवड्यात माझ्या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने काही तरी नवीन लिहावे असे वाटले. आत्तापर्यंत मला अनेकदा जिलबीवर लिहावे वाटत होते. मनात आलं चला वाढदिवसानिमित्त काही तरी गोड लिहावं. माझी जिलबी तुम्हाला कशी वाटली? जमली का? पाक आणि कुरकुरीत पणा व्यवस्थित होता का ? नक्की कळवा.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: