कढी

दुपारची जेवणं झाली कि आई सगळी झाकपाक करायची. दुधावरची साय एका भांड्यात नीट काढून ठेवायची. त्याला विरजण लावून ते व्यवस्थित दुधाच्या कपाटात ठेवायची. आई दोन प्रकारचे दही लावायची. एक पूर्ण सायीचे आणि एक दुधाचे. दुधाचे दही खाण्यासाठी आणि सायीचे दही तूप बनवण्यासाठी. मी लहान होते तेंव्हा मला दही बिलकुल आवडायचे नाही. पण बाबांना मात्र सायीचे दही आवडायचे आणि आईला त्याचे तूप बनवायचे असायचे. त्याकाळी आम्ही दुधवाल्याच्या घरी जाऊन समोर बसून दुध काढून आणायचो. त्यामुळे त्यात पाणी कमी असायचे. असे दोन -तीन दिवसाचे दही जमा झाले कि एखाद्या दिवशी ती ताक बनवायची. त्यावरचे लोणी काढून त्याचे तूप कढवायची. माझी आई कधीही विकतचे तूप आणत नाही. या तुपाच्या बेरीत साखर घालून खायला आम्हाला खूप आवडत असे.

कढी
कढी

ज्या दिवशी ताक बनवले जायचे त्याच्या दुसऱ्या दिवशी आई कढी बनवायची. ताज्या ताकामध्ये दाळीचे पीठ एकजीव मिसळायचे, त्यात मीठ, चवीपुरती साखर टाकायची ( 🙂 )आणि फोडणी करतांना जिरे, मोहरी, अद्रक, कढीपत्ता टाकायचा आणि त्याला मस्त उकळी आणायची. काही घरांमध्ये यात मिरची आणि लसणाची फोडणी पण असते तर काही टिकाणी यात हळद घालतात. मी कढी बनवतांना अद्रक, लसून, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकते. कृती जरी साधी सरळ असली तरी कढी बनवणे जरा निगुतीचे काम आहे. माझ्या अनुभवातून सांगते आहे! बेसन आणि ताकाचे एकजीव मिश्रण करणे अतिशय महत्वाचे आहे. नाही तर कढी फुटते. म्हणजे पाणी आणि दही वेगळे होते. दुसरे म्हणजे तिला उकळी येईपर्यंत त्याला हलवत राहावे लागते. पण हे सगळे कष्ट अगदी सार्थकी लागतात जेंव्हा मस्त गरम कढीची वाटी तोंडाला लागते आणि संपूनच खाली ठेवली जाते. आई कढी बनवली कि त्या दिवशी साध वरण करते. म्हणजे चवीचा समतोल साधला जातो. मला साध वरण आणि त्यावर लोणकढ तूप खूप आवडते. लहानपणी मला कढीची एवढी मज्जा वाटायची नाही कारण मला वरण भात खूप आवडायचा. पण कढी आता मला खूप आवडते. आमच्या कडे कढी खिचडी, किंवा नुसता भात याबरोबरच पुरणाच्या पोळीबरोबर पण केली जाते.

ताक बनवल कि आणखीन एक गोष्ट आमच्या घरी नक्की होते, ती म्हणजे मठ्ठा! विशेषतः उन्हाळ्यात ताकाचा थंडगार मठ्ठा प्यायला काय मज्जा येते. मठ्ठा बनवायची कृती तर कढी पेक्षा सोपी आहे. ताकामध्ये चवीपुरते मीठ, साखर, टाकून छान मिश्रण करून घ्यायचे. यात काळे मीठ टाकले तर अजून छान खमंग चव येते. आता या मठ्ठयाला कोथिंबीर टाकायची आणि हिरव्या मिरचीची फोडणी दिली कि झाला मठ्ठा तयार. ताकाचा आणखी एक आवडीचा प्रकार म्हणजे लस्सी! लस्सी म्हणलं कि आपल्याला पंजाबी लोक आठवत असले तरी इथे भारतातली सगळ्यात जास्त फेमस असणारी गोष्ट म्हणजे mango लस्सी! सगळ्या भारतीय हॉटेलमध्ये हा प्रकार मिळतो. नीरजला दही आणि ताक खूप आवडते. मी कढी जरी नेहमी बनवत असले तरी लस्सी क्वचितच बनवते. लस्सी मध्ये आंब्याच्या ऐवजी काही टाकतात का असं सहज सर्च करत असतांना मला लीची लस्सी ची रेसिपी मिळाली. वाचून तरी वाटते आहे कि छान लागेल. बघूया कधी करण्याचा योग येतो ते! http://www.lassi.info/lycheelassirecipe.html

कढी हा प्रकार भारतात सगळी कडे सारख्याच पद्धतीने बनवतात. गुजराती, राजस्थानी आणि पंजाबी कढी हे त्यातल्या त्यात फेमस प्रकार. पंजाबी कढी हि आपल्या कढी पेक्षा घट्ट असते. मी मुंबई मध्ये जेंव्हा कामाला होते तेंव्हा माझ्या कंपनीचे सर गुजराती होते. दररोज दुपारी त्यांची बायको त्यांचा डब्बा घरून पाठवत असे. कधी कधी त्यांच्या डब्ब्यात कढी असायची. आमचे सर अतिशय कमी जेवायचे. आणि उरलेला डब्बा आमच्या कडे पाठवून द्यायचे. मला त्यांची कढी अतिशय आवडायची. कधी -कधी त्यांच्या कढी मध्ये मुळा टाकलेला असायचा. ( http://www.sanjeevkapoor.com/Mooli-Ki-Kadhi-FoodFood_hindi.aspx )तशी मी गुजराती कढी आधी औरंगाबादला खाल्लेली होती पण घरचे जेवण हा वेगळाच प्रकार असतो. गुजराती कढी थोडी गोड असते पण त्यात मसाले पण जास्त असतात. गुजराती खिचडी बरोबर हा प्रकार अत्यंत छान लागतो. राजस्थानी आणि गुजराती कढी मध्ये मेथीचे दाणे टाकतात. काही ठिकाणी कढी सोबत गोळे बनवले जातात. त्याला कढीगोळे असे म्हणतात. काही ठिकाणी यात पकोडे पण घालतात. नीरज कॉलेजमध्ये असतांना एका मेस मध्ये जेवायला जायचा़. ती मेस एका कर्नाटकी बाईची होती. त्या भेंडी घालुन कढी बनवायच्या.

कढी म्हणलं कि आपल्याला ताक आणि बेसन घालून बनवलेली कढी असं जरी समीकरण माहित असलं तरी त्याला अपवाद सोलकढीचा आणि सिंधी कढीचा! त्याची तर एक मज्जाच आहे. मी ठाण्याला असतांना राणीताईच्या सासरच्या लोकांसोबत बाहेर जेवायला गेले होते. जातांना त्यांचे सारखे सोलकढी बद्दल बोलणे चालू होते. एकतर मी मराठवाड्यातली आणि त्यात वेजीटेरीयन मग मला हा प्रकार माहित असण्याची काहीच शक्यता न्हवती. जेवायला गेलो तर मोठ्या काचेच्या ग्लास मध्ये मस्त गुलाबी रंगाची कढी आली. थंडगार आणि चवीला एकदम नवा प्रकार! पहिल्या घोटाबरोबर आवडली अस काही मी म्हणणार नाही. पण हळूहळू नक्कीच त्याची चव सवयीची झाली. सोलकढी हि आमसूल आणि नारळाचे दुध यापासून बनवलेली असते. तीच गत सिंधी कढीची! सिंधी कढी, वेगवेगळ्या भाज्या उकडून त्या दही किंवा टमाटे प्युरी यात बेसन घालून बनवली जाते. इथे काही नव्या रेसिपीज शेयर करत आहे नक्की करून पहा. http://www.marathimati.net/sindhikadhi/, http://www.maayboli.com/node/46163

आज कढी बद्दल लिहायचं असं ठरलं आणि त्यासाठी नेट वर नव्या रेसिपीज शोधत असतांना एक नवीन आणि छान रेसिपी मिळाली. आंब्याची कढी! पिकलेला आंबा आणि दही याची कढी. ‘Show me the curry’ या माझ्या आवडत्या कार्यक्रमातली हि रेसिपी आहे. एक मोठा आंबा घेऊन तो उकडायचा. या कढीत जो मसाला घातलेला आहे त्यासाठी: ओले खोबरे, मेथी दाणे, थोडी लाल मिरची, जिरे, चना डाळ, तव्यावर भाजून घ्यायचे आणि त्याची पूड बनवायची. आता आंब्याची प्युरी बनवून त्यात ताक घालून एकजीव मिश्रण बनवायचे. या मिश्रणात मसाले, मीठ, घालून मंद आचेवर वाफ येऊ द्यायची. या कढीला उकळू नका असे म्हणले आहे. नंतर या कढीवर वरून फोडणी द्यायची आणि मस्त भातासोबत वाढायची. वाचून तरी छान वाटतंय. आंबा मिळाला तर नक्कीच करून पाहणार आहे मी हि कढी! http://showmethecurry.com/curries/mango-kadhi.html

आता हे एवढ कढी पुराण वाचल्यावर जर तुम्हाला कढी खावीशी वाटत असेल तर मात्र तुम्हाला आता ती बनवावी लागेल…माझ्या सारखं नाही चालणार बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात-इति नीरज!

ता. क. : थोडे विषयांतर! आपल्या रोजच्या आयुष्यात कढी वरच्या किती म्हणी आहेत. सहज लिहिता लिहिता मनात विचार आला. मग काय गुगल बाबा कि जय ! म्हणल जरा सांग बघू कढी वरच्या म्हणी आणि या सगळ्या म्हणी आल्या ! काही काही तर मी कधी पण कधी वाचल्या नाहीत! बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, शिळ्या कढीला उत, दुसर्‍याची कढी न धावू धावू वाढी, प्रीतीचो मोगो, कढीयेच्या निमतान माझ्याकडे ये गो 🙂

Advertisements

2 thoughts on “कढी

Add yours

  1. कढीबद्दल इतकं आणि इतकं छान?? आवडलं. आमच्या उत्तरभारतात बूंदी घालून आणि माझ्या सासरी मध्यभारतात बेसनाची पोकळ अलवार भजी घालून कढी करतात.

    1. Thank you मिथिला ताई! साध्या साध्या पदार्थांमध्ये प्रत्येक जण आपली एखादी गोष्ट add करतो आणि त्याची त्या घराची परंपरा होते याचे मला खूप कौतुक वाटते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: