नावडती!

karale
कारले

लहानपणी जेंव्हा आई राजा राणीची गोष्ट सांगायची तेंव्हा त्यात एक असायची आवडती राणी आणि एक असायची नावडती राणी.  आवडती राणी स्वभावाने दुष्ट तर नावडती एकदम प्रेमळ! आवडत्या राणीला सगळ मिळणार आणि नावडती राणी मात्र सतत डावलली जाणार… बरेचदा आपला स्टोरी मधला राजकुमार या नावडत्या राणीचाच मुलगा असतो… 🙂 स्टोरीत जसा नावडती वर अन्याय होतो तसाच खऱ्या आयुष्यात पण या दोघींवर जरा अन्यायच होतो असे मला वाटते …नावडती भाजी कोणती असे कोणास विचारले तर या दोघींपैकी एकीचे नाव नक्कीच ऐकू येते! एक म्हणजे कारले आणि दुसरे नाव म्हणजे शेपू! खरेतर आरोग्याच्या दृष्टीने देखील या दोन्ही भाज्या खूप गुणकारी आहेत.

कारल्याची भाजी मला कधीपासून आवडायला लागली हे काही आता आठवत नाही. पण कारल्याच्या भाजीशी एक आठवण माझ्या अजून लक्षात आहे. लहान असतांना मी जिल्हा परिषदच्या शाळेत होते. या शाळेत आमच्या सगळ्यात आवडत्या शिक्षिका होत्या… भालके बाई. दिसायला एकदम गोड, जेमतेम २८-३० वर्षाच्या आणि सगळ्या विद्यार्थ्यांशी मिळून मिसळून वागणाऱ्या.  आमच्या घराच्या गुलाबाला एखादे जास्तीचे फुल आले किंवा मोगऱ्याचा गजरा घरी असला कि पहिल्यांदा भालके बाईंचे नाव मनात येत असे . आमची शाळा तशी छोटीच होती. बरेचदा आमच्या शिक्षिका आमच्या सोबत डबा खायच्या.  आमचे घर शाळे पासून जवळ असल्याने आई आम्हाला जेवणाच्या सुट्टीत घरी येऊन जेवायला सांगत असे. पण शाळेत डब्बा नेऊन खाण्याची मज्जा काही औरच! या भालके बाईंना कारल्याची भाजी फार आवडायची. मग बाईंवर इम्प्रेशन मारण्यासाठी कारल्याची भाजी केली कि ती डब्ब्यात घेऊन जायचो आम्ही… 🙂

Baghali-Polo-Main-640x480
शेपुचा भात!

कारल्याची भाजी मला कशीही बनवलेली आवडते. मग ती कोरडी तव्यावर फ्राय केलेली असो की चिंच गूळ घातलेली असो. सगळ्याच रेसिपीत एक स्टेप असतेच ती म्हणजे कारले पातळ चकती सारखे कापून घ्यायचे. त्यांना मीठ आणि हळद लावायची आणि थोड्या वेळासाठी कापडात बांधून ठेवायचे. नंतर या कारल्याना पिळून घेऊन त्यातले कडू पाणी काढून टाकायचे. कारले मूलतः कडू असतात म्हणून त्यांचा कडू पण कमी करण्यासाठी हि भाजी बनवतांना चिंच, दही किंवा कैरी (अशातच मी एक रेसिपी वाचली त्यात चक्क कैरी आणि पिकलेला आंबा पण वापरला होता) वापरतात. माझी आत्त्या कारल्याचे लोणचे बनवायची. ती कारले दही घालून शिजवायची आणि त्याला तिळाची पूड टाकायची. तव्यावर फ्राय केलेली कारल्याची भाजी मला थोडी जास्त आवडते. कारल्याचे पातळ काप, कांदा आणि कढीपत्ता मस्त परतवून घ्यायचे, त्यात थोडे शेंगदाण्याचे कुट घालायचे आणि भाजी होत आल्यावर त्यावर थोडासा लिंबाचा रस टाकायचा. वाढतांना जर कोथिंबीर टाकली तर काय मजाल आहे कुणाची नाक मुरडण्याची! इथे फक्त इंडिअन स्टोर मध्ये कारले मिळतात. इंडिअन स्तोरच्या वारीमध्ये कारले, छोटे वांगे, तोंडले, आणि कद्दू  विकत घेणे ठरलेले असते.

आणखीन एक भाजी जिला लोक हमखास नाक मुरडतात ती म्हणजे शेपूची भाजी! कारण काय तर म्हणे वास येतो त्या भाजीचा…मला या भाजीचा वासच खूप आवडतो. आमच्या घरात सगळ्यांनाच शेपूची भाजी खूप आवडते. शेपूची भाजी आणि त्याबरोबर गरमागरम भाकरी…वाह मस्त विचार करूनच माझ्या तोंडाला पाणी सुटते आहे. माझे बाबा लग्नाआधी हि भाजी खायचे नाहीत पण आता त्यांची हि भाजी आवडती आहे. माझी आई शेपूची भाजी इतर पालेभाजी प्रमाणे मुगाची डाळ टाकून करते. कोथिंबीर जशी आपण चव येण्यासाठी वापरतो तसं इथे काही spices वापरतात. रोझमेरी, शेपू, बेसिल हे हर्ब  इथे चव येण्यासाठी वापरतात. त्यामुळे शेपूची छोटीशी जुडी इथे  हर्ब सेक्शनमध्ये मिळते. भारतात आपण याची भाजी करतो पण इथे थोडासा शेपू पास्ता किंवा कणसाचे वाफवलेले दाणे यावर वास आणि चव येण्यासाठी टाकतात. मी पहिल्यांदा जेंव्हा हि भाजी इथे बनवली तेंव्हा मला असे जाणवले कि हा शेपू आपल्या शेपुपेक्षा जरा उग्र आहे. म्हणूनच तो एवढ्या कमी प्रमाणात वापरत असावेत.

शेपूची भाजी आणि भाकरी! (फोटो: प्राची आणि क्षितीज :))
शेपूची भाजी आणि भाकरी! (फोटो: प्राची आणि क्षितीज :))

माझ्या इथल्या lab मध्ये वेगवेगळ्या देशातले लोक काम करतात. काही ब्राझीलहून, न्यूझीलंडहून आलेले, काही अमेरिकन तर बरेचसे इरानियण आणि आम्ही भारतीय. त्यात पण काही दक्षिणेचे तर काही महाराष्ट्रीयन! त्यामुळे प्रत्येकाच्या डब्यात काही न काही नवीन बघायला मिळते, चाखायला मिळते…एक दिवस माझी मैत्रीण जेवत असतांना तोच सवयीचा वास आला…शेपुचा वास होता तो. सहज उत्सुकता म्हणून विचारलं तर ती म्हणाली हि पर्शियन रेसिपी आहे भाताची ज्यात शेपू चवीसाठी घातला जातो. आत्तापर्यंत शेपू फक्त भाजी म्हणून खाल्ला होता. आता हा नवीनच प्रकार ऐकत होते. आई कोथिंबीर भात बनवायची पण हे प्रकरण नवीनच होते. मस्त तूप, केशर  आणि शेपू टाकून बनवलेला भात माझा खूप आवडता आहे. या भाताची रेसिपी इथे देत आहे.  कोणतेही पूर्वग्रह  न बाळगता ,जरा मोठे मन करून या रेसिपीला try करा नक्की आवडेल तुम्हाला.

http://theshiksa.com/2012/01/26/persian-dill-and-lima-bean-rice/

http://showmethecurry.com/daalsbeans/mung-daal-with-dill-leaves-recipe.html

Advertisements

2 thoughts on “नावडती!

Add yours

  1. मुग्‍धा, खरेच तू खूप छान आणि ओघवत्‍या भाषेत लिहीतेस- शिवाय सुनिताबाई देशपांडे च्‍या प्रमाणे तू लिहीलेले सर्व काही अगदी खरे , प्रामाणिकपणे लिहीलेले आहे, हे ही जाणवते …. मस्‍त …. असेच लिहीत रहा … मला माझया वडीलांनी सांगितले की तुझो वडीलही लेखक होते, मी त्‍यांचे लिहीलेले काही वाचलेले नाही.

    1. ब्लॉग वाचून मनापासून कौतुक केल्या बद्दल धन्यवाद सुनील देशपांडे! मला ज्या गोष्टींतून आनंद मिळतो त्या गोष्टींबद्दल इतरांना सांगायला मला आवडते! हो माझे बाबा देखील लेखक आहेत…त्यांच्या कडूनच बहुदा हे गुण माझ्यात आले असावेत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: