…तोची आवडे देवाला!

Image
शुभा आत्या, सुधीर काका आणि बसलेली वर्षा आत्या

सुधीर काका गेला त्याला आता २० वर्षे होत आली आहेत…आमचा अगदी जवळचा आवडता काका …बाबांचा सख्खा छोटा भाऊ! दिसायला अत्यंत देखणा, हुशार, मनमिळाऊ, खूप मायाळू… ज्याच्या अंगा-खांद्यावर आम्ही भावंड वाढलो…जेमतेम ३०-३२ वर्षाचा! एक दिवस अचानक चक्कर येऊन पडला आणि ब्रेन ट्युमरचे निदान झाले…बघता बघता ८-९ महिन्यात सगळ संपलं…

Image
सुधीर काका (मधला ) त्याच्या मित्रांसोबत!

त्या दिवशी उशिरा रात्री दवाखान्यातून एक माणूस घरी आला. त्याने आई बाबांना काही तरी बातमी दिली… काकाची तब्येत घसरतच चालली होती…त्यामुळे त्यांच्या मनाची थोडीशी तयारी झालेली होती… बाबा पुढील तयारीसाठी दवाखान्यात गेले. मला काही केल्या झोप येत न्हवती …काय झाले आहे हे कळत होते पण त्याचा आवाका अजून काही लक्षात आला न्हवता… आत्याला आणि इतर नातेवाईकाना फोन गेले होते…आई आतल्या खोलीत झोपली होती. आईची अजूनही हालचाल चालू होती…मला ती जाणवत होती. मी आईच्या जवळ जाऊन झोपले..आई काय विचार करत असेल? आईचे लग्न झाले आणि ती सासरी ,नांदेडच्या आजोबांच्या घरी आली. माझ्या आईच्या माहेरी माझी आई सगळ्यात धाकटी आणि लाडकी. मोठे सगळे इकडे तिकडे पसरलेले असल्याने ती आणि आज्जी आजोबा एवढेच लोक घरात. लग्न होऊन आली ती बाबांच्या घरी ७-८ माणसांचे मोठे कुटुंब. या नवीन घरात सुरुवातीला तिला खूप एकटे वाटायचे तेंव्हा तिचा जिवाभावाचा सखा झाला माझा सुधीर काका…तिचा धाकटा दीर …तिच्या आणि त्याचा वयात बराच फरक होता…आईला कामात मदद करणारा, तिच्या हाताच्या स्वेपाकाची मनापासून तारीफ करणारा, आमच्या नांदेडच्या अष्टविनायक नगरच्या घराचे बांधकाम चालू असतांना त्यावर देखरेख ठेवणारा माझा काका…
माझे नाना, राणीताई, क्षमामाई आणि गोविंदा हॉल मध्ये झोपले होते. राणी ताई, क्षमामाई आणि आत्याचा शंतनू लहान असतांना एक-दोन वर्ष नांदेडला आजोबाच्या घरी राहायचे. तो जरी आमचा काका असला तरी तो, प्रवीण काका आणि वर्षा आत्या हे तिघेजण, या छोट्या तिघांपेक्षा वयाने फार काही मोठे न्हवते…तो त्यांची चेष्टा मस्करी करायचा…आई बाबा तिथे नसल्याने त्यांची उणीव त्यांना वाटू नये म्हणून प्रयत्न करायचा. रविवारी आम्हाला सगळ्यांना केस कापायला घेऊन जायचा आणि सगळ्यांचे केस एकाच style मध्ये म्हणजे अतिशय लहान करायला लावायचा. आम्हाला चांगले संस्कार लावण्यात त्याचा मोठा हात होता. नंतर जेंव्हा आम्ही नांदेडच्या आमच्या घरी राहायला गेलो तेव्न्हाही त्याचे आमच्याकडे सततचे येणे जाणे असायचे.. माझ्या मैत्रिणीला, मनीषाला तिच्या गालावरच्या खळ्या बद्दल चिडवयाचा… मला एकदा तो म्हणाला होता कि पेन्सील गालावर दाबून ठेवली कि खळ्या तयार होतात अम्मू …मला त्याचे म्हणणे पटल्याने कितीतरी दिवस मी गालावर पेन्सिल दाबून धरून बसायचे…आज असतास तर दिसलं असतं तुला कि आताशा थोड्या -थोड्या खळ्या पडतात बरका काका… आम्हा बच्चेकंपनीवर त्याचा फार जीव होता. त्याला जॉब लागल्यावर पहिल्या पगारातून त्याने आम्हाला सगळ्यांना आई आणि आत्या सकट सगळ्यांना कपडे घेतले होते.IMG_1684

मला माझ्या आणि त्याच्या आयुष्यात खूप पराल्लेल्स दिसतात…त्याला बऱ्याचदा काहीही करण्यासाठी खूप पुश करावे लागे. त्याच्या जॉबच्या बाबतीत त्याचे आणि बाबांचे सतत बोलणे चालू असायचे. लग्नाच्या बाबतीतही तसेच सतत टाळाटाळ ! माझ्यातही तो resistant मला दिसत असतो. काहीही नवीन करायचे म्हणाले कि माझी पहिली reaction नको अशीच असते…

सकाळी कधीतरी आत्या आणि मदन मामा आले … तसे पहिले तर काकाची तब्येत अगदीच चांगली होती…एकदा आत्याकडे बिडकीनला गेला असता चक्कर येण्याचे निमित्त झाले. काही दिवसात त्याची तब्येत खालावली …मग दवाखान्यात जाऊन काही चाचण्या झाल्या…ब्रेन ट्युमर चे निदान झाले. ट्युमर बऱ्याच पुढच्या स्टेजला गेला होता. डॉक्टरांनी ऑपरेशनचा शेवटचा पर्याय सुचवला. आत्या खंबीर पणे डॉक्टरांना म्हणाली ओपेरेशन करणे हा तर एक पर्याय झाला पण काय काय होऊ शकते? सफल झाले तर ठीकच पण नाही झाले तर त्याला जन्मभराचे अधूपण येणार का? आत्याच्या या direct प्रश्नाने डॉक्टर हि थोडेशे चकित झाले होते. एवढे बळ तिच्यात कुठून आले ? काकाचे ऑपरेशन काही successful झाले नाही आणि तो कोमात गेला.

आम्ही त्यावेळी उदगीरला होतो. इथे बाबांच्या ओळखीचे डॉक्टर असल्याने आणि दवाखान्यात त्याची नीट काळजी घेतली जाईल म्हणून त्याला दवाखान्यात ठेवण्याचे ठरवले. आई -बाबा यांचे सतत दवाखान्यात येणे जाणे असायचे. हळू हळू त्याची तब्येत खराब होत गेली. त्याला नळीवाटे जेवण दिले जायचे. राणीताई कॉलेज मध्ये जातांना त्याच्या जेवणाचा डब्बा घेऊन दवाखान्यात जायची. एक दिवस तिला परीक्षा असल्याने मी गेले होते. तेंव्हा मला डॉक्टर म्हणाले तुला आत जाऊन खाऊ घालायचे का? आत मध्ये काय पाहायला मिळेल याची मला काहीही कल्पना न्हवती. आत गेले आणि मला धक्काच बसला. उंचा पुरा आणि अत्यंत देखणा असा माझा काका राहायचा देखील टापटीप…बाहेर जातांना छान कपडे, डोळ्यावर गॉगल असा ऐटीत माझा काका जायचा.. आता ओळखण्यापलीकडे कृश झाला होता. मेंदूचे ऑपरेशन झालेले असल्याने डोक्यावर केस न्हवते…हात-पाय एकदम कृश…थोडी शुद्ध असल्याने हाताची, डोळ्यांची हालचाल चालू होती..मी तेंव्हा ७ -८ वी ला असेन…त्या दिवसानंतर मी तिथे कधीच गेले नाही…

आता हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे काही दिवसापूर्वी एका अमेरिकन मुलाची गोष्ट वाचण्यात आली. त्याला माहित होते कि त्याचा कॅन्सर ३ रया स्टेजला आहे पण त्याने असा निर्णय घेतला कि या दुखण्याला सहज सामोरे जायचे…ऑपरेशन, गोळ्या, केमोथेरपी यांच्या कचाट्यातून बाहेर पडून आहे तेवढे आयुष्य आनंदात जगायचे असा त्याच्यासमवेत त्याचे आई,बाबा आणि भावाने निर्णय घेतला …. काकाचे जर ऑपरेशन केलेच नसते तर? आता हा प्रश्न जास्त सोपा झाला आहे पण तेंव्हा हा निर्णय घेणे किती अवघड झाले असेल. एकतर माणसाची आशा खूप वाईट असते. आपल्या माणसासाठी आपण प्रयत्न केले नाहीत असे नंतर वाटू नये आणि दुसरे म्हणजे तो जाणार यासाठी आपलीहि तयारी ह्वायची असते… काकाला हे शेवटचे काही दिवस मिळू द्यायला हवे होते का?

आमच्या घरी, बाबांकडे नृसिंह कुलदैवत आहे. उदगीर पासून काही घंट्याच्या अंतरावर बिदर हे गाव आहे. तेथे नृसिंहाचे मोठे मंदिर आहे. तो आजारी पडण्यापूर्वी काही दिवस आधी तो अचानक सकाळी उदगीरला आला होता. आईला म्हणाला बिदरला जाऊन येतो आज. गोविंदा आणि अम्मुला घेऊन जातो. रात्रीपर्यंत वापस येतो. तसं पाहिलं तर तो काही फार देव -देव करणारा न्हवता. आईला आश्चर्य वाटले. पण ती काही म्हणाली नाही. बस स्टेशन वर जाऊन बसलो एक दोन घंटे एकही बस मिळाली नाही…दुपारच्या सुमारास बस मिळाली …जाण्यास ३ घंटे लागतात.पोहोचेपर्यंत ५ वाजले … हे देऊळ एका बोगद्यात आहे आणि त्या बोगद्यात सतत पाणी असते म्हणून ते लवकर बंद करतात…स्टेशन वरून देऊळ अर्धा घंटा अंतरावर आहे तोपर्यंत देऊळ बंद होणार…जर दर्शन घ्यायचे तर त्यादिवशी मुक्काम करावा लागणार होता…अचानक त्याने ठरवले कि इथूनच परत जाऊ …आणि दर्शन न घेताच आम्ही रात्रीच्या गाडीने घरी परतलो…पण काकाला अचानक तिथे का जावे वाटले? त्याला या आजार पणाची चाहुल लागली होती का? जॉब , लग्न या भौतिक गोष्टीत त्याने स्वतःला म्हणूनच गुंतवले नाही का? या प्रश्नांची उत्तरं आता कधीच मिळणार नाहीत…पण सगळ्यात मोठा प्रश्न हा कि त्या दिवशी देव दर्शन का झाले नाही?

देवाचा त्याच्या बाबतचा निर्णय आधीच झाला होता?…जणू काही या भेटीने काहीच बदलणार न्हवते… का देवाला शंका होती कि काकाला पाहून तो त्याच्या निर्णयावर टिकून राहू शकला नसता ?

Advertisements

2 thoughts on “…तोची आवडे देवाला!

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: