आली माझ्या घरी हि दिवाळी!

आणखी एक दिवाळी येणार आणि जाणार सुद्धा ! आता मी इथे अमेरिकेत असल्याने इतर सणासारखे दिवाळी कधी आली आणि कधी गेली ते कळत नाही. इथे सर्व सणांना एकच स्वरूप येते. जवळपासचा विकेंड पकडायचा आणि सगळ्यांनी एकत्र जमायचे. आम्ही दोघे अजूनही विद्यार्थी असल्याने आमचे मराठी मंडळात जाणे येणे नाही. बरेचदा माझी परीक्षा नेमकी दिवाळीच्या जवळपास येते मग कशाची दिवाळी न कसच काय. आपल्याकडे फक्त घरीच नाही तर बाहेर पण  दिवाळीच्या दिवसात सणाचे वातावरण असते आणि सणाचा फील येण्यात या वातावरणाचा बराच हात असतो.  मी भारतातून येताना आकाशदिवा घेऊन आले होते. हा फोल्डीन्गचा कापडी आकाशदिवा असल्याने मी आत्तापर्यंत तोच वापरत आहे. नाही म्हणायला मी दिवाळीचा फराळ बनवते. आम्ही उटणे लाऊन स्नान करतो, लक्ष्मीपूजन करतो.aakash diva  पण माझ्या साठी दिवाळी म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्याची वाट पाहणे, खमंग फराळाचा घरभर पसरलेला सुवास, कोजागीरीपासूनच सुरु होणारी फटाक्यांची धडामधूम, दिवाळीच्या दिवशी सकाळी- सकाळी केलेले अभ्यंग स्नान, माझ्या बाबांनी लावलेली शास्त्रीय संगीताची कॅसेट…आणि याच्या पार्श्वभूमीवर धीरगंभीर आवाजात बाबांनी त्यांच्या मित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी केलेले फोन… लहानपणीची ती मज्जा काही येत नाही!

नवरात्र आणि दसरा यांच्या धामधूमी नंतर आई थोडीशी निवांत होते न होते तोच दिवाळीची धावपळ सुरु व्हायची.  बाबा आकाशदिवा आणि फटाके घेऊन यायचे. मागच्या वर्षीच्या पणत्या काढून त्या स्वच्छ करून ठेवल्या जायच्या. दिवाळीच्या दिवशी सकाळी जाऊन बाबा झेंडूची फुले घेऊन येत. मग आम्ही सगळे मिळून झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानाचे तोरण बनवून दाराला लावत असू. आमच्या नांदेडच्या घरचा हॉल खूप उंच आहे आणि त्याला गोलाकार बालकनी आहे. त्या बाल्कनीला देखील आम्ही फुलांच्या माळांनी सजवायचो. घराच्या हॉल मध्ये मोठी रांगोळी काढून ती दिव्यांनी सजवली जायची . माझ्या आईला घराला विजेची रोषणाई केलेली फार आवडते. कधी कधी दिवाळीत आम्ही अशी सजावट करत असू. आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या असल्याने आमचा खाणे आणि खेळणे असा दिनक्रम ठरलेला असायचा. मग एखाद्या दिवशी आई आम्हाला घेऊन खरेदीस बाहेर पडायची. या काळात बाजार विविध रंगांच्या आकाशदिव्यांनी, वेवेगळ्या डिझाईनच्या पणत्या आणि दिवाळीच्या मिठाया यांनी सजलेला असायचा. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असायचे. इथे जसे वातावरण ख्रिसमसच्या काळात असते तसे वातावरण आपल्याकडे दिवाळीला असते. नुसते बाजारात चक्कर मारून आले तरीही दिवाळी जवळ आल्याचे कळते. सुवासिक तेल, उटणे, लक्ष्मी पुजनासाठीचे साहित्य यांची खरेदी करून आमचा मोर्चा ड्रेसच्या दुकानाकडे वळायचा. जातांना बाबांनी एक बजेट दिलेला असायचं पण जर आम्हाला त्या बजेट पलीकडे एखादा ड्रेस जरी आवडला तरी तिच्याकडे पैसे असायचे! हे पैसे म्हणजे आईचा सिक्रेट फंड असायचा.

या सगळ्याच्या बरोबरीने आणखी एक लगबग चाललेली असायची. लहानपणी आम्ही दिवाळीला आमचे नातेवाईक आणि बाबांचे, आमचे मित्र यांना ग्रीटिंग पाठवायचो. हि ग्रीटींग्स आम्ही घरी हाताने बनवलेली असायची. दरवर्षी एक थीम ठरवली जायची. मित्रांची यादी बनवली जायची. बाबा चित्र काढण्यासाठी चांगला कागद घेऊन यायचे. माझी क्षमामाई खूप छान चित्र काढते. ती या मोहिमेची प्रमुख असायची. राणीताई पण छान चित्र काढायची पण तिचा रोल जास्त करून क्षमा माईला मदद करणे असाच असायचा. मी आणि क्षितीज लिंबू -टिंबू ! चित्र काढून ग्रीटींग्स तयार झाली कि बाबा त्यांच्या सुंदर अक्षरात त्यावर दिवाळीचा मजकूर लिहायचे. बरीच वर्ष आम्ही असे ग्रीटिंग पाठवले. माझी प्रतिभा आत्या आमची खूप आवडती असल्याने आम्हाला सगळ्यांनाच तिला ग्रीटिंग पाठवायचे असायचे. मग तिच्या घरी ४ ग्रीटिंग जायचे. ग्रीटिंग मिळताच आत्याचे पत्र यायचे. त्यात ती कोणते चित्र कोणी काढले आहे ते ओळखायची.flowers

दिवाळीला एक दोन दिवस उरलेले असतांना आई फराळाचे बनवायची. आधी बनवलं तर दिवाळी पर्यंत काही उरणार नाही याची तिला खात्री असावी. बेसनाचा लाडू, कधी खोबऱ्याचा लाडू, शंकरपाळे, करंजी, चिवडा आणि आमची आवडती चकली. या चकलीची एक गम्मत आहे. आई भाजणीची चकली बनवत नाही. ती मैद्याची चकली बनवायची. या चकलीची रेसिपी या लिंक वर आहे . (http://www.madhurasrecipe.com/diwali-recipes/Chakali—Tastes-good-as-Bhajani-Chakali )मैदा एका कापडात घालून कुकरमध्ये कोरडा वाफावायचा. या चकली मध्ये मुगाची डाळ वापरतात त्याने ती पचायला पण हलकी होते. मुगाची डाळ वरण बनवतो तशी शिजवून घ्यायची. आता मुगाची डाळ, मैदा एकत्र करायचा आणि लागलेच तर किंचित पाणी टाकायचे. मग मीठ, तिखट, तेल (मोहन), तीळ जिरे, ओवा टाकून घट्ट तीम्बायचे. मोहनाचे प्रमाण या कृतीमध्ये खूप महत्वाचे आहे. आता हे पीठ चकली पात्रात घालून जशा रेगुलर चकल्या बनवतात तशा चकल्या बनवायच्या. हे पीठ जरा घट्टच ठेवावे लागते आणि ते चकली पात्रातून काढताना आमची पुरती वाट लागायची. या चकल्या अप्रतिम होतात. दिवाळीत, आणि त्या आधी काही महिने गोड खाऊन कंटाळा आलेला असलेल्या सगळ्यांना दिवाळीत खमंग चकलीच आवडते. मी मागच्या वर्षी तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवल्या होत्या. दक्षिण भारतात याला मुरुक्कू असे म्हणतात. माझ्या कडे इथे चकली पात्र नाही. पण केक वर डेकोरेशन करण्यासाठी ज्या icing bag( with star attachment ) वापरतात ती वापरून मी चकल्या बनवल्या. आमच्या घरी सगळ्यांना गोड खूपच आवडते. त्यामुळे दिवाळीत एक दिवस बासुंदी, लक्ष्मी पूजनाला पुरणाची पोळी हे ठरलेले असते.

faralदिवाळी म्हणलं की फराळ आणि फटाके हे समीकरण ठरलेलं असतं पण आमच्या कडे दिवाळीशी आणखिन एक गोष्ट निगडीत आहे ती म्हणजे दिवाळी अंक. आमच्या कडे दिवाळीत अनेक दिवाळी अंक यायचे. त्या पैकी काही दिवाळी अंकात बाबांचे लेख असायचे. मग दिवाळीनंतर महिना दोन महिने निवांतपणे चवी-चवीने बाबा ते दिवाळी अंक वाचायचे. एखादा लेख बाबांना आवडला की तो आम्हाला वाचायला सांगायचे.

एकदा माझ्या अमेरिकन मित्राला मी भारतातली दिवाळी कशी मिस करते ते सांगत असतांना तो म्हणाला तु सणांच्या दिवसातली ती लगबग, तो झगमगाट जर मिस करत असशील तर दिवाळी ख्रिसमस मध्ये साजरी कर ना. त्या काळात इथे सुट्टी पण असते, बाहेर लोकांची लगबग असते. आम्ही जसे ख्रिसमस म्हणून लाईट लावतो तसे तू दिवाळी म्हणून लाव. मनात आले विचार तर बरोबरच आहे! शेवटी सण म्हणजे काय माणसांनी त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा विसावा घेण्यासाठी बनवलेले फुरसतीचे क्षणच.

Advertisements

One thought on “आली माझ्या घरी हि दिवाळी!

Add yours

 1. Hi Ammu…its amazing to see ur blog ..no words to express ..
  every word is flowing effortlessly …in all chapters ..
  its nice to see u grow to this stature and being so matured ..
  u made me proud by this blog …
  u have the potential to be one among the best writer’s of India..
  that too in both marathi and english ..
  my best wishes ..
  enjoy every bit of life ..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: