संत येती घरा, तोची…!

” अम्मू, राणीताई अमेरिकेला येते आहे . तिच्यासोबत एक नवीन पुस्तक पाठवतो आहे… अमलताश …प्रकाश संतांच्या पत्नीने त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत.. छान पुस्तक आहे ते.  तुला आवडेल. ” बाबांचा  इमेल आला.  🙂 राणी ताईची अमेरिका वारी झाली. पुस्तकं, आईच्या हातची मिठाई, २ सुंदर ड्रेस आणि ज्वारीचे पीठ असा अनमोल ठेवा मला मिळाला. मी, राणी ताई, क्षितिज खूप दिवसानंतर एकत्र भेटलो. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आठ दिवस कसे गेले काहीच कळले नाही. वापस निघण्याची वेळ आली. विमानात बसताच हातात ‘अमलताश’ घेतले आणि पुढचे काही दिवस जेंव्हा–जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा हे पुस्तक वाचले.  पुस्तक वाचताना मनात मात्र वेगळेच विचार चालू होते. अमलताश, कऱ्हाड. प्रकाश संतांचे घर! वनवास, शारदासंगीत, पंखा आणि झुंबर चे लेखक. प्रकाश नारायण संत, हो तेच ‘लंपन’ ला अजरामर करणारे….बाबा आणि संत काकांचा काही वर्षांचा सहवास होता. क्षणात डोळ्यासमोरून झरझर आठवणी सरकू लागल्या.  बाबांची आणि काकांची भेट, काकांचे आमच्या घरी येणे आणि सगळ्यात तीव्रतेणे आठवली ती माझी अमलताश भेट!

लंपनचे विश्व!

लंपनचे विश्व!

बाबांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार घोषित झाला आणि आमच्या घरात उत्साहाचे वातावरण आले. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आई आणि बाबांनी मुंबईला जायचे असे ठरले. पुरस्कार मिळालेल्या सर्व लेखकांसाठी एका दिवशी मुंबई दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या मुंबई दर्शनाचा एक भाग म्हणून मुंबईच्या महापौरांच्या बंगल्यावर सर्व लेखकांना चहा आणि नाश्त्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. एकीकडे सर्व लेखकांची मुंबईच्या महापौरांच्या सोबत फोटो काढण्यासाठी केविलवाणी धडपड चाललेली असतांना एका कोपर्‍यात आई –बाबा आणि आणखिन एक जोडपे निश्चिंत बसले होते. ते होते प्रकाश नारायण संत ऊर्फ भालचंद्र दीक्षित आणि त्यांच्या पत्नी. बाबांची आणि संत काकांची ओळख अशी झाली असे मला आत्ता पर्यंत वाटत होते पण  बाबांशी बोलताना बाबांनी वेगळीच स्टोरी सांगितली. बाबा आणि काका पहिल्यांदा भेटले ते एका साहित्य संमेलनात ! ती पण एक धमाल स्टोरी आहे खरेतर… बाबांना परभणीच्या साहित्य संमेलनात एका परिसंवादात भाग घेण्यास बोलावले होते.  हा परिसंवाद समकालीन कथा या विषयावर होता.  बाबांच्या भाषणात बाबांनी प्रकाश संतांच्या ‘वनवास’ या पुस्तकाचा उल्लेख केला होता. हे भाषण ऐकण्यास खुद्द प्रकाश संत श्रोत्यांमध्ये उपस्थित होते. भाषण संपताच त्यांनी येऊन बाबांना त्यांची ओळख करून दिली आणि वनवास या पुस्तकाची स्वतःची स्वाक्षरी असलेली प्रत बाबांना भेट म्हणून दिली.

या भेटी नंतर बाबा आणि काकांचा अनेक भेटी झाल्या. काही भेटी पत्रातून , एकमेकांच्या पुस्तकातून तर काही प्रत्यक्ष. बाबांचे ‘गाण्याचे कडवे’ हे पुस्तक त्यांना अतिशय आवडले. आम्ही सगळे जण आत्तापर्यंत त्यांच्या लिखाणाचे चाहते झालो होतो… वनवास, नंतर शारदासंगीत ची आम्ही पारायणे केली होती. लंपन चा मामेभाऊ म्हणायचा  ते विटीदांडू चे गाणे आम्ही तोंडपाठ केले होते…अष्ट पोतडे ..नऊ नऊ किल्ले , दश्या पेढा , अकाल कराठा बाळू मराठा, तिरंगी सोटा असेच काही तरी ! मला गालावरच्या खळीचे फार आकर्षण आहे. मला काही खळी पडत नाही .पण कृत्रिमरीत्या पडावी म्हणून माझ्या सुधीर काकाने सांगितल्या प्रमाणे मी गालावर पेन्सिल दाबून ठेवायचे लहानपणी! काकांनी या गालावरच्या खळी ला दिलेली उपमा मला खूपच आवडते …ते म्हणतात दुधात साखर विरघळण्यासाठी चमचाने हलवल्यावर जसा खड्डा पडतो तशी गोड खळी मनीच्या गालावर पडायची !

प्रकाश संत

प्रकाश संत (लोकसत्ता मधून)

काकांशी प्रत्यक्ष भेट होण्याचा योग तसा खूप उशिरा आला… नांदेडला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संमेलन करण्याचे ठरले आणि त्यात प्रकाश संतांना अध्यक्ष म्हणून बोलवावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला. बाबांची आणि त्यांची ओळख असल्याने बाबांनी त्यांच्याशी बोलावे असे ठरले. ठरल्याप्रमाणे बाबांनी काकांना कार्यक्रमाबद्दल  सविस्तर माहिती देणारे पत्र लिहिले आणि नांदेड मध्ये आमच्याच घरी मुक्काम करावा असे सुचवले. काकांनी पण ते आमंत्रण आनंदाने स्वीकारले. ते येणार हे ठरताच आईवर थोडेसे दडपण आले होते. त्यांना आमच्या कडे चांगले वाटावे म्हणून आईची धडपड चालली होती. आमच्या घरातील मधली खोली काकांसाठी तयार करून ठेवली.  त्यांना गोड आवडते असे कळताच आईने खव्याच्या पोळीचा घाट केला. काका सुद्धा अगदी घरचे असल्यासारखे आमच्याकडे वावरले. त्यांचा साधे पणा, मितभाषी स्वभाव आम्हाला खूप भावला. या भेटीनंतर जेंव्हा केंव्हा आई त्यांना भेटली तेंव्हा या खव्याच्या पोळीची ते नक्की आठवण काढत ! प्रकाश संत आमच्या घरी येणार हे समजताच आईने सगळे घरच साफ करायला काढले होते. जणू काही दिवाळी किंवा दसराच आहे ! मी पण जरा  मॅडच  आहे… आपल्याकडे म्हणतातना साधू संतांचा सहवास हि पण एक प्रकारची दिवाळीच!

माझ्या final year च्या परीक्षेनंतर आई, बाबा आणि मी असे तिघेजण सहलीला गेलो होतो. कऱ्हाड, गणपती पुळे, कोल्हापूर, मग तुळजापूर आणि ढोकी असा दौरा करायचे ठरले. कऱ्हाड सोडून इतर सर्व ठिकाणे देव दर्शनाची होती आणि ढोकीला माझी मावशी असते. मला असे वाटले होते कि आईला पाठीच्या दुखण्यामुळे नांदेड-गणपती पुळे असा मोठा प्रवास झेपणार नाही म्हणून आम्ही कऱ्हाडला ब्रेक घेण्याचे ठरवले. तिथे बाबांचे मित्र विद्याधर मैसकर असतात. त्यांच्याकडे आमचा मुक्काम होता. पण खरे कारण वेगळेच होते.

बघता -बघता एक वर्ष झाले होते संतांच्या अपघाती निधनाला! टिव्हीवर कार्यक्रमात खाली बातमी आली होती …प्रकाश संतांच्या स्कूटरचा अपघात होऊन त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. बातमी पाहिली आणि  मनातून वाटत होते कि हि अफवा असावी. अशा अफवा कधीच का खोट्या ठरत नाहीत! त्यानंतर काकांना उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले पण या अपघातातून ते काही परत आले नाही! काकांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कऱ्हाड मध्ये एक कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमात त्यांच्या ‘झुंबर’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते आणि त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरणार होते. आई- बाबांनी त्यास उपस्थित राहावे अशी संतांच्या पत्नीची, सुप्रिया दीक्षित यांची खूप इच्छा होती. आम्ही आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम होता. संध्याकाळी आई-बाबा आणि मी  ‘अमलताश’ या संतांच्या घरी भेट देण्यास गेलो. २ वर्षापूर्वी मी सोडून आमच्या घरचे सगळे ‘अमलताश ‘ला आले होते. माझी इंजीनीरिंग ची परीक्षा असल्याने माझे येणे झाले न्हवते. त्यावेळेसचे घराचे वर्णन आणि पाहुणचार याच्या रसभरीत कथा मी आई -बाबा कडून ऐकल्या होत्या…मी मात्र प्रथमच त्यांच्या घरी चालले होते. माझ्या मनात मी या घराची एक इमेज बनवलेली होती….आणि प्रत्यक्षात जे पाहत होते ते मनातल्या इमेज शी पडताळून पाहत होते… काकांसोबत त्या घराचे चैतन्य पण नाहीसे झाले होते…या घराची ‘ओळख’ असलेली बाग, आम्ही संध्याकाळी गेलो असल्याने मला बघता आली नाही.  जणू अमलताशला भेट देण्यास मला जरा उशीरच झाला होता…

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s