त्या फुलांच्या गंधकोशी!

दिवाळी म्हणलं की फराळ आणि फटाके हे समीकरण ठरलेलं असतं पण आमच्या कडे दिवाळीशी आणखिन एक गोष्ट निगडीत आहे ती म्हणजे दिवाळी अंक. आमच्या कडे दिवाळीत अनेक दिवाळी अंक यायचे. त्या पैकी काही दिवाळी अंकात बाबांचे लेख असायचे. मग दिवाळीनंतर महिना दोन महिने निवांतपणे चवी-चवीने बाबा ते दिवाळी अंक वाचायचे. एखादा लेख बाबांना आवडला की तो आम्हाला वाचायला सांगायचे. असंच एका दिवाळी अंकात आलेली ती दीर्घ कथा/ लघु कादंबरी मा‍झ्या अजून लक्षात आहे. त्या कथेचे नाव होते ‘असा झगा सुरेख बाई’. लेखिकेचे नाव मात्र आता आठवत नाहीये! लहानपणापासूनच मला परी कथा फार आवडतात. तसं पहिला तर ती कथा काही conventional norm प्रमाणे परी कथा नाही कारण या कादंबरीत  न राजा आहे कि राणी… त्यातली नायिका आहे अडा हॅरीस ५० वर्षांची लोभस आज्जी! मध्ये काही वर्ष ही कादंबरी मी पूर्णपणे विसरले होते. ही कादंबरी मूळ इंग्लीश मधून वाचायची खूप इच्छा होती. Flowers for Mrs. Harris (Mrs. Harris goes to Paris) या मूळ इंग्लीश कादंबरीचा हा मराठी अनुवाद.  हि कादंबरी पहिल्यांदा प्रकाशित झाली ती १९५८ मध्ये. पण आजही ती तेवढीच रीयालीस्तिक वाटते.  माणसांची स्वप्न सारखीच तर आहेत तेंव्हा काय आणि आज काय…

Mrs. Harris goes to Paris
Mrs. Harris goes to Paris

मा‍झ्या लग्नाच्या आधी कधीतरी बोलताना नीरजला मी या कादंबरी विषयी बोलले होते. गम्मत म्हणजे त्याला काही केल्या या नावाची कादंबरी दिसेना. तो मला म्हणाला की त्या कादंबरीचे नाव तू चुकीचे सांगत आहेस. खरा घोळ लक्षात आला तो असा… इंग्लंड मध्ये ही कादंबरी Flowers for Mrs. Harris या नावाने प्रसिद्ध झाली होती आणि मी वाचलेल्या अनुवादाच्या सुरुवातीला हेच नाव वाचल्याचे मा‍झ्या लक्षात होते. पण अमेरिकेत किंवा इंग्लंड सोडून इतर ठिकाणी ही कादंबरी Mrs. Harris goes to Paris या नावाने ओळखली जाते. सध्या ही कादंबरी प्रिंट मध्ये नसल्याने नवी प्रत त्याला काही मिळाली नाही पण त्याने second hand प्रत माझ्यासाठी गिफ्ट म्हणून न विसरता घेऊन ठेवली होती.  मराठी अनुवाद वाचलेला असला तरीही आणि मुख्य म्हणजे शेवट काय आहे ते पूर्णपणे माहीत असूनही एका बैठकीत मी ती कादंबरी संपवली. यावेळेस देखील ती कादंबरी मला प्रचंड आवडली.

अडा हॅरीस हि लंडन मध्ये घरकामास मदत करणारी बाई. कामात अत्यंत चोख, प्रेमळ, मानी आणि म्हणूनच तिच्या मालकीनींची आवडती. प्रत्येक घरातील व्यक्ति आणि त्यांच्या सवयी तिला पुरत्या ठाऊक आहेत. एकदा अडा एका घरी काम करत असतांना तिच्या मालकिणीचा एक ड्रेस पाहते आणि तो ड्रेस काही केल्या तिच्या मनातून जात नाही. मालकीण तिला सांगते की हा ड्रेस तिने पॅरिस मध्ये Dior या अत्यंत उंची दुकानातून घेतला आहे. असा एक ड्रेस आपल्याकडे पण असावा असा तिच्या मनाला ध्यास लागतो. या ड्रेसची किंमत ऐकल्यावर खरे तर अडा हा ध्यास सोडून देईल असे आपल्याला वाटते. परंतु त्या ड्रेसची अशी काही मोहिनी अडा हॅरीस च्या मनावर ठसलेली असते की ती तो ड्रेस मिळवायचाच असा पण करते. जवळची शिल्लक वजा करून आणि काही दिवस बचत केली तर निदान २ वर्षात आपल्याजवळ नक्की पैसे जमा होतील असे तिला वाटते. हे पैसे जमा करण्यात नशीब पण तिला साथ देते. काही रक्कम लॉटरिच्या तिकिटातून मिळालेल्या बक्शिसामधून जमते तर काही तिच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून जमा होते आणि उरलेले पैसे ती बचतीतून साठवते. नशीब जसे पैसे साठवण्यात मदत करते तसेच पैसे गमावण्यास पण कारणीभूत होते!

पण शेवटी तो दिवस उजाडतो आणि आपली अडा हॅरीस पॅरिसला जाऊन पोहोचते.  पॅरिस मध्ये तिच्यासाठी वेगळ्या समस्या वाट पाहत असतात. आत्तापर्यंत ड्रेस घेणे म्हणजे दुकानात जायचे ड्रेस शोधायचा आणि विकत घ्यायचा एवढेच तिला माहित असते पण उंची दुकानातून ड्रेस घेणे म्हणजे वेगळाच प्रकार असतो आणि त्या साठी तिला निदान १० दिवस तरी पॅरिस मध्ये राहावे लागणार असते. आता आली ना पंचाईत ! या अचानक आलेल्या संकटाना सामना करण्यात तिला मदद करतो तो तीचा लाघवी स्वभाव. तिची लंडन मधली जिवाभावाची  मैत्रीण १० दिवस तिच्या कामाचा भार उचलण्यास तयार होते.  तिचा साधा भोळा स्वभाव त्या दुकानातील सर्वांना आवडतो. तिच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या आत्तापर्यंतच्या ड्रेस मिळवण्याच्या ध्येयाने प्रभावित  होऊन तिला मदद करते.  अडा देखील त्यांची मने जिंकते आणि या छोट्याश्या कालावधीत सुद्धा ती त्यांच्या आयुष्यांना स्पर्शून जाते… त्यांच्या आयुष्यांना वेगळी कलाटणी देते आणि शेवटी ज्या क्षणांची ती वाट पाहत असते तो क्षण येतो आणि अडा तिचा स्वतःचा Dior ड्रेस घेऊन वापस निघते. गोष्ट इथे संपत नाही…

या कादंबरीचा शेवट मला वेगवेगळ्या कारणांसाठी खूप आवडतो. मिसेस हॅरीस ड्रेस घेऊन इंग्लंडला परत येते इथे लेखकाने कादंबरी संपवली नाही. तसे केले असते तर ती एक सर्वसाधारण कादंबरी झाली असती. एक चुकीचा मेसेज आपल्याला मिळाला असता. कारण या क्षणापर्यंत आपल्याला पण वाटते कि काही तरी मिळवण्याचा ध्यास घेऊन काम केले आणि ते मिळाले कि यापुढे आपले सगळे चांगले होते. पण आयुष्य असे साधे सरळ कधीच नसते.  मिसेस हॅरीस परत येते आणि पुन्हा कामावर रुजू होते. तिच्या मालकीणी पैकी एक जण होतकरू अभिनेत्री असते. तिला एका कार्यक्रमासाठी चांगल्या ड्रेसची आवश्यकता असते. मुळातच प्रेमळ आणि मदद करण्याचा स्वभाव असणारी अडा तिला तिचा ड्रेस एका रात्री साठी देते. ती अभिनेत्री तो ड्रेस अनावधानाने जाळते आणि खराब करते. तो खराब झालेला ड्रेस अडाला दुसर्या दिवशी त्या अभिनेत्रीच्या घरी मिळतो आणि ती पुरती खचून जाते. जळालेला कुरूप ड्रेस हातात घेऊन निराश झालेली अदा आठवली कि मला आजही वाईट वाटते. पण त्याच क्षणी दारावरची बेल वाजते. तिच्या साठी पॅरिसहून एक मोठे पार्सेल आलेले असते. या पार्सेल मध्ये तिच्या साठी तिच्या पॅरिस मधल्या मित्र-मैत्रिणींनी  पाठवलेल्या भेटी येतात.  अडा फक्त १० दिवस त्यांच्या सहवासात राहिलेली असते पण या अल्पकाळात तिने आयुष्य भराचे सोबती मिळवलेले असतात. या पत्रांमधून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात तिच्या येण्याने कसा बदल झाला ते सांगितलेले असते.

mugdhaया कादंबरीत वेगवेगळ्या ठिकाणी फुलांचा मस्त वापर केला आहे.  अडा ला फुले खूप आवडतात आणि वेळोवेळी तिच्या मालकीणी तिला त्यांच्याकडची एक दिवस जुनी झालेली फुले देत. ती सुध्दा या फुलांना आनंदाने स्वीकारत असे आणि त्यांचे बुंधे कापून पाण्यात जिवंत ठेवत असे. या फुलांच्या पाण्यात एखादे तांब्याचे नाणे टाकले कि फुले जास्त दिवस टिकतात असे तिचे म्हणणे असते! मिसेस हरीसच्या टोपीवर देखील एक गुलाबाचे फुल असते जे मान हलवल्यावर वर खाली होते! मला पण फुले खूप आवडतात. औरंगाबादला असतांना आमच्या कॉलेज जवळ एक ग्रीन हाउस होते. तिथे अनेक रंगाची  जरबेराची फुले होती. एकदा आत्याच्या वाढदिवसाला आणि एकदा राणीच्या वाढदिवसाला मी फुलांचे गुच्छ इथून नेले होते. मला स्वतःला निशिगंधाच्या फुलांचा मोठा गुच्छ घेण्याची खूप इच्छा होती पण ते कधीच जमले नाही. इथे ३० स्ट्रीट नावाचे एक मोठे रेल्वे स्टेशन आहे तिथे एक फुलांचे दुकान आहे. त्या दुकानासमोरून गेल्यावर मला खूप प्रसन्न वाटते.

कादंबरीच्या शेवटी आलेल्या पार्सल मध्ये सगळ्यात मोठे पार्सल असते फुलांचे! तिला आवडतात म्हणून पाठवलेले गुलाब, जरबेरा फुलांचे अनेक रंगांचे गुच्छ तिची छोटीशी खोली भरून टाकतात आणि आपल्याला वेगळेच समाधान मिळते.  या शेवटामुळे लेखकाने अतिशय तरल पणे सांगितले आहे कि शेवटी आयुष्यात काय महत्वाचे आहे? स्वप्नं  पहावीत, ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक धडपड पण करावी पण असे करतांना आयुष्य पण एन्जोय करावे. कारण ध्येय मिळवणे जेवढे महत्वाचे असते तेवढाच महत्वाचा असतो तो ते मिळवण्याचा प्रवास. तो उंची ड्रेस कधी न कधी खराब होणारच होता पण हि नवी नाती तिला जन्मभर साथ करणार आहेत.

सहज मनात विचार आला पहिल्यांदा जेंव्हा मी हि गोष्ट वाचली तेंव्हा मी जेमतेम १२-१३ वर्षाची असेन आणि आत्ता पुन्हा वाचतांना मी २५ वर्षांची होते काही बदलला का या काळात? काही नवे अर्थ सापडले का मला ? आता तो ड्रेस मला माणसांच्या इच्छांचे प्रतिक वाटतो …ज्याने त्याने आपापला Dior ड्रेस शोधायचा आणि तो मिळवण्यासाठी धडपडत राहायचे.  आता मी माझ्या स्वप्नातल्या ड्रेसच्या मागे धावत आहे. कधी माझ्या आशा पल्लवित होत आहेत तर कधी मी निराश होत आहे…अशा निराश क्षणी मला मिसेस हॅरीस आठवते आणि आठवतात ती फुलं… वाटते दारावर कधीही टकटक होईल आणि माझेही घर फुलांनी भरून जाईल… 🙂

Advertisements

8 thoughts on “त्या फुलांच्या गंधकोशी!

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: