आपण यांना खाल्लेत का?

आपली खाद्यसंस्कृती किती श्रीमंत आहे हे पहिल्यांदा कळते ते शाळेत जाणे सुरु झाल्यावर! मैत्रिणीच्या डब्ब्या मधली भाजी आपल्या भाजी सारखी कशी काय नाही ? तिची आई खोबरे कसे काय टाकते भाजीत ? किंवा दाळ घातल्यावर हि भाजी किती वेगळी लागते! असे छोटे छोटे प्रश्न मनात उत्सुकता निर्माण करतात. पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर होस्टेल वरच्या जेवणाची ओळख होते आणि तीच भाजी एवढी वाईट कशी काय बनू शकते असा प्रश्न पडतो! मग मित्र-मैत्रीणींसोबत हॉटेल मध्ये जाऊन नवे पदार्थ चाखले जातात. महाराष्ट्रीयन जेवण सोडून गुजराथी, पंजाबी, (आज काल थाई, मेक्सीकन , इटालियन आणि चायनीज ) पदार्थांची ओळख होते. लग्न झाल्यानंतर तशा अनेक गोष्टी बदलतात पण सर्वात जास्त जाणवणारा बदल म्हणजे खाण्या पिण्याच्या सवयी ! मग आमच्या कडच्या आमटीत साखर नसते बरका अशी नव्या वधूस कौतुकाने माहिती पुरवली जाते ! आमचे लग्न झाल्यानंतर मी बनवलेल्या कित्येक पदार्थांचे नावं देखील नीरज ला माहित नसायची. अशाच काही गंमतशीर पदार्थांविषयी, आपण यांना खाल्लेत का?

फक्की : माझ्या आई शिवाय इतर कोणी हा पदार्थ बनवल्याचे मला आठवत नाही. आम्ही लहान असतांना शाळेत १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला खाऊ म्हणून खिरापत द्यायचे. फक्की या खिरापतीची कित्येक पटीने चांगली आवृत्ती ! कणिक तूप टाकून मस्त भाजून घ्यायची आणि त्यात गुळ कुस्करून टाकायचा आणि एकजीव मिश्रण बनवायचे. हा पदार्थ खूप कोरडा असतो आणि खाताना तो सारखा उडतो म्हणून त्याला फक्की (फकफकीत ती फक्की!)  म्हणत असावेत असा माझा अंदाज आहे.

गडगीळ: लहान असतांना मला हा पदार्थ खूप आवडायचा. गव्हाचे पीठ मोहन घालून घट्ट तीम्बायचे. या कणिकेची छोटी बोटी घेऊन त्याची मध्यम जाडीची पोळी लाटायची. नंतर त्या पोळीचे शंकरपाळे करतांना जसे काप करतात तसे काप करायचे. आता त्या शंकरपाळ्याच्या दोन विरूद्ध टोकाच्या कोनांना एकत्र जोडायचे, शंखाचा आकार बनवायचा आणि तेलात तळायचे. गुळाचा एकतरी पाक बनवून घ्यायचा. सुगंधासाठी त्यात थोडी विलायची टाकायची. आता तळलेले गडगीळे या पाकात टाकायचे. खाताना या गडगीळावर मस्त तुपाची धार सोडायची. गडगीळ बनवतांना गुळच वापरावा. त्यामुळे त्याला खमंग चव येते.

गूळपाङ्गळु किंवा गुन्तपाङ्गळु: (मला माहिती आहे कि ह्या पदार्थाविषयी मी मागच्या ब्लॉग मध्ये पण लिहिलं होत… पण मला माझ्या आधीच्या ब्लॉग मधले रेफेरेंस पुन्हा पुन्हा वापरायला आवडतात! मला उगीच आपला शंकर -जयकिशन झाल्या सारखा वाटतं! ( तेही त्यांच्या फेमस गाण्यांचे तुकडे नवीन गाण्यात अधून मधून पेरत असायचे. :)) इडली दोश्याच्या संगतीने आई आणखीन एक प्रकार करते. त्याचे नाव फार गमतीदार आहे. गूळपाङ्गळु किंवा गुन्तपाङ्गळु (Thanks to Sheetal, I came to know the actual name of this dish! actual name: गुंथपोंगनालू). याच्या पिठात उडदाच्या दाळीच्या बरोबरीने हरभऱ्याची दाळ पण टाकतात. पीठ आंबले कि त्यात मीठ, हिरवी मिरची टाकून नीट मिक्स केले जाते. मग ते गूळपाङ्गळु बनवण्यासाठीच्या खास पात्रात टाकले जाते आणि त्यावर झाकण टाकून ते शिजवले जाते. मग मस्त टपोरे गूळपाङ्गळु तयार होतात. आई या गूळपाङ्गळु सोबत चिंचेची चटणी करते. हि चटणी अतिशय सोपी आणि अत्यंत चविष्ट आहे. चिंचेचा कोळ घ्यायचा आणि त्याला फोडणी द्यायची. यात घट्टपणा येण्यासाठी तेलावर परतलेल्या कांद्याची पेस्ट टाकायची आणि चवीला गुळ, मीठ, तिखट.

जिमनॅस्टिक: नुकतीच राणीताई अमेरिकेला येऊन गेली. बर्याच दिवसानंतर तिच्याशी निवांत गप्पा झाल्या. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यातलीच एक आठवण म्हणजे ती बनवायची ते जिमनॅस्टिक! आम्ही या पदार्थाला जिमनॅस्टिक का म्हणायचो ते मला बिलकुल आठवत नाही. बहुतेक इंग्लिश नाव दिलं कि आपला पदार्थ एकदम भारी आहे असे आम्हाला वाटले असावे किंवा त्या काळात तेवढाच फॅन्सी शब्द आम्हाला माहित असावा. आणखी एक शक्यता अशी कि त्या काळात ऑलिम्पिक चालू असावे. आत्ताच्या काळात याला रोटी रोल किंवा फ्र्यांकी म्हणतात. (एक महत्वाची गोष्ट म्हणजे तीने ज्या काळात हा पदार्थ बनवायला सुरुवात केली तेंव्हा आम्हाला मेक्सीकन वगैरे काही माहित न्हवते. ) ताजी किंवा शिळी पोळी वापरून हे जिमनॅस्टिक बनवता येते. पोळीवर लोणचे/ चटणी लावून त्यावर भाजीचा थर द्यायचा आणि घरात असेल नसेल ते सगळे त्यावर टाकून त्याचा रोल बनवायचा एवढीच काय ती कृती! पण काय छान लागायचा ते जिमनॅस्टिक!

चॉफी: हा नीरजने शोध लावलेला पदार्थ आहे. चॉफी म्हणजे चहा आणि कॉफी दोन्ही वापरून बनवलेला चहा/ कॉफी!

सुशीला: मी लहान होते तेंव्हा मला या पदार्थाचे विशेष आकर्षण नव्हते. तसं पाहिलं तर त्याची चव काही युनिक आहे असा म्हणता येत नाही. थोडासा पोहे किंवा फोडणीच्या भातासारखी याची चव आहे  आणि नाव तर भल मोठ! सुशीला करायची कृती अतिशय सोपी आहे. सुशीला म्हणजे मुरमुरे भिजवून त्याचे कांदे पोहे बनवतो तसा पदार्थ बनवणे.  मुरमुरे मला कुरकुरीतच आवडतात.

घोळाना/पचडी : आपल्याकडे मेथी मिळायला लागली कि पहिले काही दिवस ती महाग असते. मग नंतर अगदी कमी किमतीत ३-४ जुड्या मिळायला सुरु होतात. अशावेळेस या मेथीचे काय करावे असा प्रश्न पडतो. नेहमीचे पदार्थ, जसे कि मेथीची भाजी, पराठे, वरण करून आणि खाऊन कंटाळा आला कि आई मेथीचा घोलाणा करते. घोळाना करण्यासाठी मेथीची भाजी ओबड-धोबड चिरून घ्यायची. त्यात तिखट मीठ शेंगदाण्याचे कुट घालून मिसळून घ्यायचे आणि वरून फोडणी टाकायची. मस्त! भाकरी किंवा पोळी बरोबर तोंडी लावण्यासाठी हा प्रकार मस्त आहे.

Advertisements

2 thoughts on “आपण यांना खाल्लेत का?

Add yours

  1. एकदम छान वाटले वाचून . लहानपणीच्या आठवणी एकदम ताज्या झाल्या. आणखी काही पदार्थ मला आठवतात जी आई करते.
    ० वरणफळे – लाटलेल्या पोळीचे तुकडे करून वरणात शिजवायचे. तुप टाकून खायला खुप मजा यायची. मला पूर्ण कृती माहिती नाहिये.
    ० कडबू – थोडक्यात शिजवलेल्या करंज्या. त्यात बहुतेक गुळ आणी आणखी काहीतरी असयचे. 🙂

    1. धन्यवाद! वरणफळे मला पण खूप आवडतात. मी त्यावर स्वतंत्र लेख पण लिहिला आहे. वाचून सांग कसा वाटला ते !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: