त्या दोघी !

तिची आणि माझी ओळख तशी जुनीच… मी शाळेत शिकत असतानाची. Quiz मध्ये हमखास  विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर… पण मध्यंतरी च्या काळात काही गाठ भेट नव्हती. मग अचानक अशा रुपात आणि इथे ती भेटेल असे कधीच वाटले नाही.  मला आठवते आमची पुनर्भेट!  लग्नानंतर  मी अमेरिकेत MS साठी अप्लाय करण्यासाठी (statement of purpose ) SOP लिहित होते आणि नीरज मला त्यासाठी मदत करत होता. एके दिवशी नीरजने एक नवीनच माहिती पुरवली. फिलाडेल्फियाला नीरज ज्या कॉलेज  मध्ये PhD करत आहे ते कॉलेज पूर्वी  Woman’s Medical College of Pennsylvania अशा नावाने ओळखले जायचे आणि या कॉलेज मधूनच  भारतातली पहिली महिला  डॉक्टर झाली. हो तीच ती ! आनंदीबाई जोशी . दुसरीची माझी ओळख अशातली. सध्याच्या काळात इंटरनेट मुळे आपल्या लोकांशी आणि भाषेशी संबंध जोडून ठेवणे सहज शक्य झाले आहे. मराठी वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके सहज मिळतात आणि माझ्यासाठी मराठी मालिका !!!    अशीच  एकदा एक मालिका  बघताना नवीन येणार्‍या मालिकेच्या जाहिरातीतून एक चिमुरडी झळकली आणि गोड आवाजात म्हणाली ” माझी आई म्हणते… ” पुढे तीच चिमुरडी भारतात स्त्रीशिक्षणाच्या  प्रसारमोहिमेची मुख्य झाली. दोघींचे माहेरचे नाव यमुनाच ! दोघींचे पती विदुर आणि त्यांच्यापेक्षा वयाने खूप मोठे … ते दोघेही विधवा विवाहाचे आणि स्त्री शिक्षणाचे  पुरस्कर्ते.  समाजाचा आणि घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी आपापल्या पत्नीस शिकवले. त्यामुळे दोघींच्याही जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला तो त्यांच्या लग्नानंतर… पुढे जाऊन एक झाली आनंदीबाई जोशी आणि दुसरी झाली रमाबाई रानडे. रमाबाई, आनंदीबाईनी शिकावे  आणि समस्त स्त्री वर्गास त्याचा फायदा ह्वावा हे त्यांच्या नवरयांचे  स्वप्न होते पण त्या दोघींनी ते स्वप्न स्वतःच्या डोळ्यात उतरवले आणि त्यात स्वतःचे रंग भरले.  त्या दोघींच्या आयुष्यातले साम्य मात्र इथेच संपते.  दोघींची ध्येय वेगळी होती आणि त्यांच्या पुढची आव्हाने पण वेगवेगळी होती. आनंदीबाईंचे पती गोपाळराव हे अतिशय तापट  होते. महादेवरावांचे रमाबाईवर अतिशय प्रेम होते, ते अत्यंत  मऊ आणि मृदू स्वभावाचे होते. (निदान मालिकेमध्ये तरी असे दाखवले आहे.) आनंदीबाई  डॉक्टर झाल्या खऱ्या पण ते ज्ञान वाटण्याची  संधी मात्र त्यांना मिळाली नाही  … रमाबाई त्यामानाने नशीबवान ! त्यांनी जे ज्ञान मिळवले ते भरभरून वाटण्याची त्यांना संधी मिळाली.

आनंदीबाई जोशी… किती कमी माहिती आहे  मला त्यांच्या बद्दल ! Quiz मध्ये हमखास  विचारला जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर…भारतातली पहिली महिला डॉक्टर एवढीच काय ती ओळख आणि रमाबाईन्ची ओळख आत्ता आणि एका मालिकेच्या निमित्ताने झाली हे तर खरे म्हणजे दुर्देवच म्हणायला हवे. ज्यांनी आम्हा मुलीनी शिकावे यासाठी जीवाचे रान केले त्यांच्याबद्दल साधी प्राथमिक  माहिती नसावी ?

त्या काळात स्त्री रुग्णांना पाहण्यासाठी स्त्री डॉक्टर उपलब्ध नसत त्यामुळे स्त्रियांची अत्यंत गैरसोय होत असे. आपल्या नवजात बाळाच्या मृत्यूनंतर आनंदीबाईनी डॉक्टर होण्याचे ठरवले.  आनंदीबाईनी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घ्यावे याकरिता त्यांचे पती गोपाळराव जोशी यांनी अनेक प्रयत्न केले. या प्रयत्नांची गोष्ट अमेरिकेत त्या काळी प्रसिध्द होणार्‍या मिशनरी मासिकात प्रकाशित झाली. ती कथा New Jersey मध्ये राहणार्‍या मिसेस कारपेंटर  यांनी वाचली आणि या धडपडीने त्या अतिशय भारावून गेल्या. मग बराच काळ आनंदीबाई आणि मिसेस कारपेंटर यांचा पत्रव्यवहार झाला.

आनंदी बाई जोशी … पदवीदान सोहळ्यानंतर : Drexel University archives
आनंदी बाई जोशी … पदवीदान सोहळ्यानंतर : Drexel University archives

सुरुवातीला कुतूहलापोटी एकमेकांची माहिती मिळवणे सुरु झाले. कारपेंटर  बाईना भारताविषयी काहीच माहिती नसल्याने त्यांनी आनंदीबाईना त्यांचा फोटो पाठवण्यास सांगितले. नऊवारी साडी आणि अंगभर दागिने घातलेला फोटो पाहून त्यांना विश्वासच होईना की जिच्या इंग्रजी भाषेवरच्या प्रभुत्वाने आपण एवढे प्रभावित  झालो ती  अवघी १८ वर्षाची तरुणी आहे.    मिसेस कारपेंटर यांनी Woman’s Medical College of Pennsylvania येथील शिक्षका रेचलबोडली यांना आनंदीबाईविषयी सांगून त्यांना या कॉलेज मध्ये प्रवेश देण्यात यावा अशी विनंती केली. आनंदीबाईनी प्रवेश मिळवताना जे पत्र लिहिले होते आणि मिसेस कारपेंटर यांचा रेचलबोडली आणि आल्फ्रेड जोन्स यांच्याशी झालेला पत्र व्यवहार Drexel  University archives (http://archives.drexelmed.edu/) मध्ये आजही उपलब्ध आहे. त्यांचे प्रवेश  मिळवण्यासाठी लिहिलेले पत्र वाचताना जाणवते ते त्यांचे  इंग्रजी भाषेवरचे  प्रभुत्व आणि त्याची विचारांची प्रगल्भता. हे पत्र खरे तर मूळ इंग्रजीमधूनच वाचायला हवे. “Dear Sir….I ask nothing for myself, individually, but all that is necessary to fit me for my work. I humbly crave at the door of your College, or any other that shall give me admittance.”

anandibai joshiमी Drexel  University archives धुंडाळत असताना मला त्यांचा एक फोटो पण मिळाला. त्या फोटोत त्यांच्या चेहर्‍यावर विद्वतेचे तेज आणि आत्मविश्वास  दिसतो. आनंदीबाई अमेरिकेत आल्या खऱ्या पण इथली हवा त्यांना सहन झाली नाही. थंडीने त्यांना खोकल्याचा त्रास होऊ लागला. तो काळ १ ८ ८ ४ – १ ८ ८ ६ चा आहे तेंव्हाची अमेरिका आणि आत्ताची अमेरिका यात जमीन अस्मानाचा फरक आहे… आता इथे ‘कोथिंबीर ते कढीपत्ता’ पर्यंत  सगळे काही मिळते आणि तरीही आम्ही ताजे भाकरीचे पीठ मिळत नाही म्हणून कुरकुर करतो ! अनेक हाल सहन करून आनंदीबाई अखेर १८८६ साली डॉक्टर झाल्या. त्यांच्या पदवीदान सोहळ्याला पंडिता रमाबाई प्रमुख पाहुण्या होत्या. भारतातली पहिली महिला आज इथे पदवी ग्रहण  करत आहे असे त्या वेळी घोषित करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि जमलेल्या सगळ्यांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले.  पण त्याच काळात त्यांचा TB चा त्रास वाढला. अमेरिकेतले थंड वातावरण त्यांना सहन झाले नाही. त्यांनी भारतात परत जाण्याचा निर्णय घेतला. भारतात परत येताच त्यांनी कोल्हापूराला डॉक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण दुर्देव असे कि २२ वर्षाच्या कोवळ्या वयात आनंदीबाईनी या जगाचा निरोप घेतला. जे शिक्षण मिळवून लोकांची सेवा करण्याचा त्यांचा मानस होता ते वापरण्याची त्यांना संधी मिळाली नाही.

रमाबाईना उत्तम शिक्षण मिळावे याकरिता महादेवराव यांनी खास शिक्षिका ठेवली होती.  महादेवराव जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत रमाबाईनी त्यांना  पदोपदी साथ दिली. महादेवराव रानडे यांच्या निधनानंतर अनेक वर्षे त्या महिलांसाठी कार्यरत होत्या. सेवासदन नावाची स्त्रियांसाठी काम करणारी संस्था चालू करण्यात आणि चालू ठेवण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. महिलांचे शिक्षण, त्यांना समाजात बरोबरीचे स्थान आणि  समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

मी नीरजला पहिल्यांदा भेटले तेंव्हा त्याने मला एकच प्रश्न विचारला होता. “ तुला पुढे शिक्षण घेण्यात रस आहे का?”    मी लहानपणापासून फारशी महात्वाकांक्षी  नाहीये.  मला अभ्यासाचा कंटाळा नाही पण परीक्षांची मात्र प्रचंड भीती वाटते. GRE, TOEFL या परीक्षा फक्त मेरीटमध्ये आलेले विद्यार्थीच देतात असे मला वाटायचे . आपण काय तेवढे हुशार नाही…  माझ्या लग्नानंतर मा‍झ्या आयुष्याला पण वेगळे वळण लागले आहे. इथे आल्यानंतर स्वतःला मी नव्याने भेटले आहे …

मी इथे Woman’s Medical College of Pennsylvania च्या अगदी हाकेच्या अंतरावर राहते . इथेच कुठे तरी आनंदीबाई राहिल्या असतील का ? याच रस्त्यांवरून त्या गेल्या असतील का ?… मागच्या काही दिवसापासून मी आनंदीबाई बद्दल झपाटल्यासारखे वाचते आहे आणि का कोण जाणे दर वेळेस त्या त्यांच्या वयाच्या बाविसाव्या वर्षी वारल्या  हे वाचून डोळे भरून येत आहेत. त्यांच्या निधनानंतर गोपाळरावांनी त्यांच्या अस्थि अमेरिकेला पाठवल्या होत्या. न्यूयॉर्क जवळ त्यांची कबर आहे (Poughkeepsie Rural Cemetery, New York) . तेथे एकदा तरी जाऊन त्यावर फुले वाहण्याची मनापासून इच्छा आहे बघूया कधी योग येतो का ते…

Advertisements

5 thoughts on “त्या दोघी !

Add yours

  1. मस्त जमले आहे. नेमके ब्लोगचे स्वरूप काय राहणार आहे माहिती नाही. अशा अनेक जणांचे काम देशात-परदेशात आहे ज्यांच्या साठी चिरा, पनती लागली नाही….ज्याना आपण आज विसरत चाललो आहोत..लेखाचे स्वरूप असेच सहज आणी ललितच असावे. तुम्हा सर्व पाडलंकरामध्ये एक संवेदन शील दृष्टी आहे..मस्त….राळेरासकर.

    1. Thank You Raleraskar kaka!
      मला आवडणाऱ्या आणि ज्यांच्या पासून मला प्रेरणा मिळते अशा लोकांबद्दल मी लिहिते. आनंदीबाई आणि रमाबाई त्यातल्याच! पण मी फक्त तेवढ्याच विषयावर लिहिते असे नाही. माझ्या इतरही ‘प्रेमांविषयी’ मी लिहिते जसे कि फूड आणि माझा रीसर्च!

  2. Really thjs is new amazing bit of info to me..thanks for sending such a eye opening info and a glimpses of history.. thanks

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: