बाजार

लहानपणी भाजी आणायची असली कि आम्हा भावंडांपैकी कुणीतरी  सायकल घेऊन तरोडा नाक्यावर जात असू. तिथे आईच्या ओळखीची भाजीवाली असायची. ती आम्ही गेलो तरीही व्यवस्थित भावात चांगली भाजी द्यायची. तस नाक्यावर जाऊन भाजी आणायची वेळ कधी- कधीच यायची. त्याकाळी आमच्या कॉलोनीत भाजी, फळे  टोपलीत घेऊन विकणाऱ्या बायका यायच्या. आंब्याच्या दिवसात आंबे, हिवाळ्यात बोरे, पेरू आणि सिताफळे आणि प्रत्येक सिझनला वेगळ्या वेगळ्या भाज्या डोक्यावरच्या टोपलीत घेऊन उन्ह पावसाची पर्वा  न करता या बायका आम्हाला घरपोच भाजी आणि फळे आणून देत असत. या सगळ्यांशी आमच्या आईची एकदम गट्टी होती. चांगला माल असला कि त्या तडक सकाळी- सकाळी आमच्या घरी येत आणि म्हणत,” बाई तुमच्या हाताची भोवनी झाली कि लई लवकर संपतंय बघा टोपलं!” भोवनी म्हणजे दिवसातली पहिली विक्री! असे प्रत्येक जणच म्हणायचे! त्यांची एकमेकांशी शर्यत लागलेली असायची. आई कधी कधी त्यांना वैतागून म्हणत असे,”तुमच झाल खर बायानो पण मी इतका सगळं विकत घेऊन काय करू? अस करते एक भांडं ठेवते बाहेर तुम्ही सगळे एक एक फळ त्यात टाकून जात जा!” त्या आई ला चांगली भाजी द्यायच्या आणि आई कधी कधी उरलेली भाजी/ वरण किंवा ताजे ताक त्यांना द्यायची. जुन्या काळी भाजीवाल्या फक्त भाजी घेऊन येत नसत. दिवसभराच्या घाई -गडबडीत दोन क्षणांचा विसावा आणत असत. त्यातल्या बऱ्याच जणींशी आईचे घरोब्याचे संबंध झाले होते.

दरम्यानच्या काळात कधीतरी तरोडा नाक्याजवळ एक आठवडी बाजार भरावा अशी मागणी जोर धरू लागली होती. आम्ही उद्गीरहून परत आलो तेंव्हा हा बाजार सुरूही झाला होता. दर बुधवारी भरणारा हा बाजार सुरुवातीला फक्त तरोडा नाका आणि जिल्हा परिषद कॉलोनी एवढाच मर्यादित होता. पण पाहता पाहता तो एका बाजूला भावसार चौक, दुसऱ्या बाजूला वामन नगर रोड आणि तिसऱ्या बाजूला वर्कशोप कॉर्नर पर्यंत पसरला. सकाळी जवपासच्या गावातून लोक भाजीपाला, फळे, धान्य, मसाल्याचे साहित्य आणि घरगुती वस्तू विकायला घेऊन येत असत. बसायला एक पोते, छत्री, दुपारच्या जेवणाचा डब्बा आणि समोर मांडलेली भाजी एवढंच त्यांच दुकान असे. मग दिवसभर आपली सगळी शक्ती पणाला लाऊन भाजी विकण्याचा त्यांचा खटाटोप चालत असे. सकाळी भाज्यांची किंमत आस्मानाला भिडत असे आणि संध्याकाळ होता होता ती जमिनीला पोहोचायची. मागाल त्या भावात सामान देऊन टाकून आवराआवर करून हि मंडळी रात्री आपापल्या घरी जायची. त्या दिवशी तरोडा नाका ते आमच्या घरी यायला अर्धा पाऊन घंटा लागायचा.

मला बाजारात जायला बिलकुल आवडायचे नाही. गर्दी, गोंधळ यांचा मला तिटकारा यायचा आणि लोकांशी बोलायला लाज वाटायची. काकू, मावशी, मामा करून भाव करणे काही जमायचे नाही. कधी कधी मैत्रिणींसोबत किंवा क्षमामाई सोबत मी बाजारात जात असे. राणी ताईला मात्र बाजारात जायला फार आवडायचे. ताजी भाजी आणि वेगवेगळी फळे पाहून ताजे तवाने वाटते असे ती म्हणायची. आई बाजारात गेली कि तिला सगळच विकत घ्याव वाटे. आईच्या पाठीला दुखापत झाल्याने तिला जास्त ओझे उचलायला डॉक्टरनी मनाई केली होती.  भाजी आणायला जायला जरी आवडत नसले तरी भाजी आणल्यानंतर ती साफ करणे, निवडून ठेवणे हे मला आवडायचे. नांदेडला नि नंतर औरंगाबादला भाजी निवडून ठेवणे हे माझे काम असायचे. पुढे मी इंगीनीयरिंग साठी औरंगाबादला गेले आणि नंतर २ वर्षे मुंबईला. बाजारात जाण्याची काही वेळच आली नाही.

P1010141अमेरिकेत भाजी आणायला जाने हा एक आमचा प्रोग्रामच असतो. मी इथे आले तेंव्हा आम्ही Fresh grocer किंवा Walmart /path-mark मधून भाजी किंवा फळे आणायचो. इथे काही typical भाज्याच मिळतात. मग कधी कधी भारतीय दुकानात जाऊन छोटे वांगे, भेंडी, कद्दू, तोंडली, कारले कधी luck असेल तर गवार अशी बाहेर न मिळणारी भाजी घेऊन येतो. आजकाल इथे नाव काढाल ते सगळे मिळते! उन्हाळ्यात जेंव्हा बाहेर वातावरण चांगले असते तेंव्हा इथे छोटी -छोटी फार्मर्स मार्केट भरतात. आम्ही आधी जिथे राहायचो त्या भागात एक छोटे मार्केट होते. इथे आमिष नावाची एक जमात राहते. हे लोक आजही आधुनिक साधनांचा उपयोग न करता शेती करतात. असे हे आमिष लोक पेनसिल्वानिया भागात जास्त आहेत. एक मोठा टेबल टाकून त्यावर भाजी, फळे, मध, दुध, अंडी घरी बनवलेले ज्याम/ जेली किंवा केक / कुकी इथे विकायला ठेवलेले असतात.  हे सर्व घरी बनवलेले आणि ओरगानिक असल्याने याची किंमत खूपच जास्त असते.  इथल्या गाईना growth हार्मोन्स दिलेले असल्याने दुधाची चव वेगळीच लागते. म्हणून आम्ही तिथून दुध आणायचो. पण हिवाळा सुरु झाला कि ते लोक हि दुकाने बंद करतात.

मॉल संस्कृती सर्वत्र पसरलेली असताना, फिलाडेल्फिया मधलं रीडिंग टर्मिनल मार्केट हा माझ्यासाठी  एक सुखद धक्काच होते.http://www.readingterminalmarket.org/ हे मार्केट ५-६ ब्लॉक च्या दरम्यान पसरलेले असून इंडोर मार्केट आहे. फिलाडेल्फिया जेंव्हा शहर म्हणून विस्तारत होत तेंव्हा विल्ल्यम पेन्न यांनी या मार्केटची स्थापना केली.

virtualtourist: Reading Terminal Market!
virtualtourist: Reading Terminal Market!

शहरभर विखुरलेले भाजी वाले, मासेवाले आणि शेतकरी यांना एका छताखाली आणण्याच्या हेतूने हे मार्केट सुरु झाले. इथे भाज्या, फळे, फुले, दुग्धजन्य पदार्थ, मास-मासे असे सगळे एकाच ठिकाणी मिळते. या सर्व गोष्टी जवळपासच्या भागात पिकवलेल्या असतात आणि त्यांच्या किमती पण वाजवी असतात.  इथे छोटी छोटी हॉटेल्स पण आहेत. रविवारी आणि बुधवारी इथे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट मिळते. हि आमची आवडती जागा आहे. दुपारचे जेवण तिथे करून संध्याकाळी भाजी आणि समान घेऊन आम्ही घरी येतो. आधी मला कढीपत्ता किंवा नारळ आणायला भारतीय दुकानात जावे लागायचे पण आजकाल इथे पण कढीपत्ता मिळतो! आंबे, डाळींब, पपई अशी exotic फळे पण इथे मिळतात. जर थाई पदार्थ बनवायचा असेल तर लागणारे लेमोन ग्रास, बेसिल हे सगळे इथे मिळते.

 फिलाडेल्फिया मधल आणखी एक आवडत मार्केट म्हणजे Produce Junction! नीरजचा एक मित्र, हिमांशू आम्हाला पहिल्यांदा इथे घेऊन गेला होता. अतिशय स्वस्त भावात भाजी पाला आणि फळे, फुले, फुलझाडे  मिळण्याचे हे एकमेव दुकान असेल. फिलाडेल्फिया आणि न्यू जर्सी या भागात हि दुकाने जास्त प्रमाणात आहेत. हि दुकाने जास्त करून Mexican  लोक चालवतात. तिथे १-१.५ किलोच्या भाज्यांच्या आणि फळांच्या पिशव्या भरून ठेवलेल्या असतात आणि फक्त २-३ $ ला!

Produce Junction!
Produce Junction!

तिथे गेलो कि काय करू आणि काय नको असे होते. जन्मात कधी खाल्ले नसतील एवढे सफरचंद इथे आल्यावर आम्ही खाल्ले. ‘दिल तो पागल हे’ मध्ये माधुरी दीक्षितला पटवण्यासाठी शाहरुख खान जसे मोठे टरबूज घेतो तसे टरबूज विकत घ्यायचे माझ्या किती दिवसापासून डोक्यात होते. एकदा मी हट्ट करून ३-४ किलोचे टरबूज घेऊन आले होते आणि अगदी कंटाळा येईपर्यंत ते टरबूज मी खाल्ले होते! तिथून एकदा मी अद्रक आणल होत जो मी पुढे १ वर्षभर वापरला! पुदिना आणि कोथिंबीर याच्या मोठ्या मोठ्या जुड्या घेऊन आलो कि त्याची छान खोबरे घालून चटणी करून ठेवायची. तिथे जाऊन आलो कि आमचा फ्रीज भाज्यांनी गच्च भरून जायचा.  नंतर मी आणि माझी मैत्रीण असे दोघे मिळून तिथे जायचो आणि भाज्या अर्ध्या अर्ध्या वाटून घ्यायचो! इथे लग्नात नवरीच्या हातात फुलांचा गुच्छ असतो तो बनवण्याचे इथले फुलवाले खूप पैसे घेतात . माझ्या अमेरिकन मैत्रिणीच्या लग्नात तिने या दुकानातून तिला हवी ती फुले विकत घेऊन अर्ध्या किमतीत छान फुलांचा गुच्छ बनवला होता! 

आजकाल मला बाजार आवडायला लागला आहे. काही ओळखीच्या काही अनोळखी चवी/ गंध, रंगीबेरंगी फळे, फुले भाज्या मनावरचे मळभ दूर करतात. काही क्षणांसाठी मन खरच टवटवीत होते आणि नव्या उमेदीने मी कामाला लागते.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: